corona virus : जनतेची काळजी घेण्यास लोकप्रतिनिधी अपयशी, परशुराम उपरकर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:53 PM2020-09-21T13:53:22+5:302020-09-21T13:55:10+5:30
कुडाळ : सिंधुदुर्गात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची ...
कुडाळ : सिंधुदुर्गात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यास अपयशी ठरले आहेत, असा आरोप मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना साथीच्या सुरुवातीला प्रत्येक तालुक्यात जाऊन कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी बैठका घेतल्या.
त्यावेळी त्यांच्या बातम्या आणि बैठकांचे फोटो सर्वत्र झळकत होते. परंतु या नियोजन बैठकांचा जनतेला व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणताही लाभ झाला नाही. हे सिंधुदुर्गात सध्या वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिद्ध झाले आहे.
गेले सहा महिने सरकार म्हणून सत्ताधारी आमदार-खासदारांना कोरोना साथरोगाचे नियंत्रण करण्यासाठी योग्य नियोजन करता न आल्याने रुग्णांची संख्या वाढली व त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. याला जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार व पालकमंत्री जबाबदार आहेत.
सर्वच लोकप्रतिनिधी मोठमोठ्या घोषणा करतात. त्या बातम्या वृत्तपत्रांतून छापून येतात. ते केवळ दिखाऊपणा करतात. आमदार वैभव नाईक यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदार संघात जात १० व्हेंटिलेटर दिल्याची घोषणा केली. परंतु हे व्हेंटिलेटर आल्यानंतर त्यांना अपुरा कर्मचारीवर्ग देण्याची ते घोषणा करू शकले नाहीत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर धूळखात पडण्याची भीती आहे. कारण १० वर्षांपूर्वी कणकवली व सावंतवाडी येथे ट्रामाकेअर सेंटर सुरू झाले. पण डॉक्टर व कर्मचारी दिले नसल्याने ते धूळखात पडले आहे.
कुडाळ येथे महिलांसाठी उभारण्यात आलेले रुग्णालय चार महिन्यांत सुरू होणार असे सांगून आमदार नाईक यांनी या रुग्णालयाला १ कोटीचा निधी मिळाल्याची घोषणा केली. त्यानंतर मंत्र्यांकडे जाऊन त्यासाठी निधीची मागणी केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. जर निधी आला असेल तर पुन्हा मागणी करण्याची गरजच काय होती? असा सवालही परशुराम उपरकर यांनी केला आहे.
विकास झाल्याचे सांगण्याचा खोटा प्रयत्न
पालकमंत्र्यांनी महामार्गबाधितांना दोन दिवसांत पैसे देण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले? आठ दिवसांत महामार्गाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून देणार होते त्याचे काय झाले ? रुग्णालयात कर्मचारी नेमण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले ? विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी व स्मारके उभारण्याची घोषणा पालकमंत्री आणि खासदारांनी केली.
परंतु शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना वेगवेगळया कामांच्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करुन वृत्तपत्रातून बातम्या व फोटो प्रसिद्ध करीत जनतेला विकास झाल्याचे सांगण्याचा खोटा प्रयत्न का केला जात आहे? असा परखड सवाल उपरकर यांनी केला आहे.