corona virus : पीपीई कीट परिधान करून केले त्या महिलेवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:16 PM2020-09-28T12:16:50+5:302020-09-28T12:18:02+5:30
कोरोनासारख्या संकटकाळात एखाद्याच्या कुटुंबातील मृत्यूनंतर त्या कुटुंबावर ओढवणारी मानसिक स्थिती आणि या स्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असे माणुसकीचे दर्शन घडवणारे शिरगांव येथील चार कोरोना योद्धे त्यांनी केलेल्या कामगिरीवरून सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले.
शिरगांव : कोरोनासारख्या संकटकाळात एखाद्याच्या कुटुंबातील मृत्यूनंतर त्या कुटुंबावर ओढवणारी मानसिक स्थिती आणि या स्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असे माणुसकीचे दर्शन घडवणारे शिरगांव येथील चार कोरोना योद्धे त्यांनी केलेल्या कामगिरीवरून सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले.
याबाबत अधिक वृत्त असे की, किंजवडे परबवाडी येथील सुभद्रा जानू परब (७५) ही महिला कोरोना काळात आपल्या शिरगांव चौकेवाडी येथील मुलीकडे आली होती. २५ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने तिचे रात्री ९.१५ च्या सुमारास निधन झाले. तिच्या निधनानंतर किंजवडे येथील नातेवाईकांना फोन करून कळविण्यात आले.
वृत्त समजताच नातेवाईक तातडीने रातोरात शिरगांव चौकेवाडी येथे आले. तिच्या मुलीच्या कुटुंबातील दोन सदस्य कोरोना बाधित तर जावई होम क्वारंटाईन असल्याने किंजवडे येथील नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शवली.
सहकार्याची भूमिका
अंत्यसंस्कारासाठी कोणीच पुढे येत नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. अशा परिस्थितीत शिरगांवातील काही ग्रामस्थांनी किंजवडे येथील ग्रामस्थांशी संपर्क साधला. त्यावेळी किंजवडे येथील ग्रामस्थांनी किंजवडे येथे त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास कोणतीही हरकत नाही. अशी सहकार्याची भूमिका दाखविली.
सामाजिक कार्य
शिरगांव गावचे पोलीस पाटील चंद्रशेखर साटम यांच्यासह चौकेवाडी येथील सुजित चौकेकर, महेश चौकेकर, संतोष चौकेकर या चार कोरोना योद्ध्यांनी त्या कुटुंबाला धीरोदत्तपणे आधार दिला. घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगून पीपीई कीट परिधान करून राजे ग्रुप या सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिकेने त्या वृद्धेचा मृतदेह किंजवडे येथील तिच्या गांवी नेऊन रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. कोरोनासारख्या कठीण काळात माणुसकीच्या झऱ्याला अजूनही पाझर बाकी आहे. याचा अनुभव शिरगांववासीयांना याची देही याची डोळा आला.