corona virus : सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:31 PM2020-08-25T16:31:55+5:302020-08-25T16:34:13+5:30
खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.
ओरोस :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर आणखी काही विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. याबाबत खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हा परिषद प्रशासनातील काही कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने जिल्हा परिषद कार्यालय पूर्ण बंद ठेवण्याबाबत कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची मागणी होऊ लागली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधित सापडले आहेत. तसेच महसूल यंत्रणेतील काही कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.
सर्वच शासकीय कार्यालय बंद ठेवून सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार आहे. त्यामुळे कार्यालय बंद ठेवण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेण्याचे आदेश आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करून डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करता येणे शक्य आहे.
सिंधुदुर्गात दखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ई पास ची सुविधा सुलभ केली जाईल त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे यावेळी जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
मृत्यूदर स्थिर ठेवण्यासाठी खबरदारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव साठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे १५ सप्टेंबर पर्यंत रुग्ण संखेत वाढ झालेली दिसून येईल तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये रुग्ण संख्या वाढली तरी मृत्यू दर स्थिर ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जाईल.
सर्वांकडून नियमांचे पालन
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे सहकार्य प्रशासनाला चांगले मिळाले असून गावागावातील गणपती उत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गणपतीची भजने, आरत्या आपल्या घरातच तसेच गावातच ग्रामस्थ करत आहेत. सोशल डिस्टन्सचे पालन केलेले पहावयास मिळत आहे त्यामुळे आलेले चाकरमानी,तसेच सर्व स्थानिक नागरिक, ग्रामस्थ नायमांचे पालन करत असलेले पहावयास मिळत आहे