corona virus : काशीविश्वेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह रद्द, घातले साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:28 PM2020-07-27T15:28:33+5:302020-07-27T15:36:32+5:30
कोरोना महामारीमुळे काशीविश्वेश्वर देवस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड. प्रवीण पारकर यांनी दिली.
कणकवली : कणकवली शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षांपासून आयोजित केला जात होता.
कोरोना महामारीमुळे काशीविश्वेश्वर देवस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड. प्रवीण पारकर यांनी दिली.
दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाल्यानंतर भजने, डबलबारी सामना व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले जात होते. प्रत्येक प्रहर वाटून दिलेल्या समाजाकडून नित्य सेवा केली जात होती.
शहरातील प्रत्येक मंडळाच्यावतीने या सात दिवसांच्या कालावधीत वेगवेगळे संदेश देणारे चित्ररथ देखावे शहरातील मंडळे बनवायची आणि रात्र जागवली जायची. परंतु सध्या कोरोना संकट वाढत असल्याने ही परंपरा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार मंदिरात फक्त गणेश पूजन करीत मानकरी व शहरातील विविध मंडळांचे प्रतिनिधी घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी केली. तसेच हे संकट दूर व्हावे म्हणून साकडे ही घालण्यात आले.
यावेळी काशीविश्वेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पारकर, खजिनदार सुरेश कामत, सचिव सदानंद बांबुळकर, सदस्य शिवप्रसाद उर्फ आबा उचले, गणेश उर्फ बंडू हर्णे आदी उपस्थित होते.