corona virus -बाजारपेठ बंद ; नागरिकांनी घरातच राहणे केले पसंत ; महामार्गावर स्मशान शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 02:11 PM2020-03-23T14:11:55+5:302020-03-23T14:13:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कणकवली शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी दुकानांबरोबरच रिक्षा, हॉटेल, खाजगी वाहने, टपऱ्या बंद ठेवत जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी योगदान देत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कणकवली शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी दुकानांबरोबरच रिक्षा, हॉटेल, खाजगी वाहने, टपऱ्या बंद ठेवत जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी योगदान देत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
कणकवली तालुक्यातील कनेडी तसेच अन्य ठिकाणचे आठवडा बाजार व अन्य सेवा देखील रविवारी ठप्प झाल्या होत्या. एसटीच्या फेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे मुंबईवरुन कणकवली रेल्वेस्टेशन व बसस्थानकात दाखल झालेल्या चाकरमान्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.
दररोज गजबजणाऱ्या बाजारपेठा पडल्या ओस !
दररोज साधारणतः पहाटे ५ वाजल्यापासुन कणकवली शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा गजबजू लागतात. व्यापारी आपली दुकाने उघडून व्यवसाय सुरु करतात. त्यामुळे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ गजबजलेली दिसून येते. मात्र ' जनता कर्फ्यू ' च्या निमित्ताने रविवारी कणकवली शहरात शुकशुकाट निर्माण झाला होता.
ग्रामीण भागातही काहीशी तशीच स्थिती होती.नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले. कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक, मुख्य बाजारपेठ, आचरा रोड याठिकाणी दररोज अनुभवायला मिळणारी वाहतुक कोंडी आढळून आली नाही . रस्त्यावर वाहनेच दिसत नव्हती. कणकवली शहरात कमालीची शांतता दिसत होती.
रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर प्रवासी !
देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जनता कर्फ्यू दिवशी सकाळी ६ वाजल्यापासुन बाहेर गावाहुन येणारे प्रवासी रेल्वेस्टेशन व बसस्थानकावर दिसत होते.
राज्य परिवहन महामंडळामार्फत बससेवा तुरळक प्रमाणात सुरु ठेवण्यात आली होती. कणकवली बसस्थानकातुन देवगड व काही अन्य मार्गांवर सेवा चालु ठेवण्यात आली होती. रेल्वेने आलेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय या निमित्ताने होताना दिसत होती. त्यामुळे चाकरमान्यांनी आपल्या मुंबई येथील घरातच थांबुन या कोरोना व्हायरसशी संघर्ष करावा असे आवाहन सरकारने केले आहे. तरीदेखील चाकरमानी गावाकडे मोठया संख्येने येत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातही १०० टक्के प्रतिसाद !
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, नांदगाव, तळेरे, खारेपाटण, कनेडी या प्रमुख मोठया बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांमध्ये दरदिवशी मोठी रहदारी असते. जनता कर्फ्यूच्या निमित्ताने या बाजारपेठा पहाटेपासुनच ओस पडल्या होत्या.
महामार्गावरील या बाजारपेठांमध्ये वाहने थांबली होती. रोजचा वाहनांचा आवाज आणि नागरिकांची गर्दी नसल्याने मुंबई-गोवा महामार्ग, राज्यमार्ग व ग्रामीण रस्ते ठप्प झाले होते. नांदगाव , कनेडी येथील आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. एकंदर कणकवली तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद जनता कर्फ्यूला लाभला.
पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त !
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. यासाठी वाहतूक पोलीस तसेच पोलिसांची पथके ठिकठिकाणी तैनात होती. गस्तही सुरू होती. पोलीसानी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अत्यावश्यक सेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते सज्ज !
कणकवली शहरात रविवारी नागरिकांना अत्यावश्यक सेवा लागलीच तर सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी आपली रिक्षा सज्ज ठेवली होती. त्या रिक्षावर ' अत्यावश्यक सेवा ' असा फलक त्यानी लावला होता. तसेच नागरिकांनी दूरध्वनी द्वारे आपल्याला संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी सोशल मिडियाद्वारे केले होते.