corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 02:56 PM2020-07-28T14:56:40+5:302020-07-28T15:00:15+5:30
सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच.
दोडामार्ग : सध्या कोरोना विषाणूची दहशत इतकी निर्माण झाली आहे की, आपल्या जन्मदात्रीचे अंतिम दर्शन घेणेसुद्धा कठीण झाले आहे. या विषाणूच्या फैलावामुळे क्वारंंटाईन असलेल्या व्यक्तींच्या घरात कोणी मृत झाले तर त्याचे लांबूनही दर्शन घेण्यास दिले जात नाही. असाच प्रसंग कुबल कुटुंबीयांवर ओढवला. सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच.
कुबल कुटुंबीय हे मूळ पाल गावचे. मात्र, तिलारी प्रकल्प बाधित असल्याने त्यांनी भेडशी येथे घर बांधले. सोनु कुबल कामानिमित्त पुणे येथे आपल्या कुटुंबासह राहतात. तर त्यांची आई व भाऊ भेडशी येथे राहतात. त्यांच्या भावाचे गतवर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वहिनी व पुतण्या आईसह राहत होते. सोनु कूबल यांची आई रुक्मिणी बाबाजी कुबल हिचे वय १०२ एवढे होते. पूर्ण आयुष्यात त्यांनी कोणतेही डॉक्टरी उपचार घेतले नव्हते. तरीही त्यांनी शंभरी पार केली.
गेल्या पंधरा दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. एका मुलाला गतवर्षी देवाज्ञा झाली. तर दुसरे दोन मुलगे कामानिमित्त पुणे येथे राहतात. लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकले. कदाचित अन्नपाणी न घेता पंधरा दिवस ही माऊली मुलांचीच वाट पाहत होती. परंतु नियतीला ते मंजूर नसावे! पुत्र गावी येऊनही त्यांना मातेचे व मातेला पुत्रांचे शेवटचे दर्शन झालेच नाही.
सोनु कुबल यांना आपली आई अंथरुणाला खिळली असल्याचे समजताच त्यांनी गावी येण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या नियम व अटींचे पूर्ण पालन करून येणे त्यांना ग्राह्य होते. शासकीय निकषानुसार त्यांनी ई-पासद्वारे भेडशी गाव गाठले.
मात्र, घरी जाऊन मातेचे शेवटचे दर्शन घेण्यास अडथळा आला तो संस्थात्मक क्वारंंटाईनचा. कोरोनाची झपाट्याने वाढ होत असलेल्या पुणे शहरातून ते दोघे आल्याने ग्रामस्थांनी त्यांना घरी जाण्यास विरोध केला. तो फक्त कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे. कारण या रोगाची भयानकता संपूर्ण जगाला हादरून गेली आहे.
शासन नियमानुसार त्यांना घरी जाण्याअगोदर क्वारंंटाईन होणे भाग पडले. क्वारंंटाईन होऊन दोन दिवस झाले आणि जन्मदात्रीने घरी प्राण सोडला. कोण जाणे आपल्या पुत्रांंची शेवटची भेट होईल याची ती माऊली वाट पाहत होती. मात्र, माय-लेकरांची भेट झालीच नाही.