corona virus : कोरोनावर अधिकृत लस आलेली नाही : राजेंद्र पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:48 AM2020-10-05T10:48:31+5:302020-10-05T10:50:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खारेपाटण : राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरीदेखील कोरोनातून उपचार घेऊन बरे होऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खारेपाटण : राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरीदेखील कोरोनातून उपचार घेऊन बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या व आरोग्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. परंतु, कोरोनावर अद्यापही अधिकृत अशी कोणतीच लस आलेली नाही. जनतेनेच आता स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाच्या नियम व अटींचे आपण काटेकोरपणे पालन केले तरच आपण सर्व मिळून कोरोनावर मात करू शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी खारेपाटण हायस्कूल येथील कार्यक्रमात केले.
कोरोनाच्या संकटमय काळात आरोग्य विभागाच्यावतीने ज्या शासकीय व खासगी सेवेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे काम केले त्या सर्वांचा वैश्य मेडिकल ट्रस्ट मुंबई व कणकवली तालुका शिवसेना यांच्यावतीने कोविड योद्धा म्हणून गौरव व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला वैश्य मेडिकल ट्रस्ट मुंबईचे सचिव सुनील खाडये, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अमित सावंत, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख मीनल तळगावकर, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व खारेपाटण-तळेरे शिवसेना विभागप्रमुख महेश कोळसुलकर, खारेपाटण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, युवा विभागप्रमुख तेजस राऊत, युवा सेनाप्रमुख भूषण कोळसुलकर, खारेपाटण शाखाप्रमुख शिवाजी राऊत, संतोष गाठे, गिरीश पाटणकर व प्रदीप इस्वलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील-यड्रावकर यांनी कोरोनाच्या काळात ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले किंवा स्वत:च्या जीवावर बेतून रुग्णसेवा केली त्या सर्वांचे कोरोना योद्धा म्हणून आभार मानले.
चौकट
मंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धा प्रमाणपत्र
यावेळी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण गावातील व पंचक्रोशीतील डॉक्टर यांच्यासह आरोग्य कर्मचाºयांचा आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यात डॉ. प्रसाद मालंडकर, डॉ. उमेश बालन, डॉ. सचिन पारकर, डॉ. विजय दळवी, तिथवली आरोग्य सेवक जितेंद्र गौरखेडे, रवींद्र बोभाटे, नंदकुमार खाडये या सत्कारमूर्तींचाही समावेश होता.