corona virus : जिल्हा रुग्णालयामध्ये दर्जेदार सुविधा पुरवा : के. मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 02:44 PM2020-09-17T14:44:53+5:302020-09-17T14:45:54+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिल्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
सिंधुदुर्ग : जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिल्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दारे व खिडक्या तातडीने दुरुस्त कराव्यात. विशेषत: महिला वॉर्डमधील दुरुस्ती तातडीने करून घ्यावी. रुग्णांना आंघोळीला गरम पाण्यासाठी गिझर बसवावेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी थंड व गरम असे दोन्ही प्रकारचे पाण्याचे फिल्टर बसवावेत, अशा सूचना मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड नियंत्रण कक्ष सुरू केला असून कोविड संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास तसेच द्यावयाची असल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
दोन खासगी रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहित
कणकवलीतील संजीवनी रुग्णालयामध्ये ६ खाटा तर मालवणातील रेडकर रुग्णालयामध्ये १८ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव असणार आहेत. यामध्ये नियमित सेवा व विलगीकरणासाठी रुपये ४ हजार, व्हेंटिलेटरशिवाय आयसीयू दर ७ हजार ५00 तर व्हेंटिलेटरसह आयसीयूचे दर ९ हजार रुपये याप्रमाणे शासनाने ठरवून दिले आहेत. हेच दर या दोन्ही खासगी रुग्णालयामध्ये आकारण्यात येतील. याबाबत के. मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.