corona virus : एसटीसह रेल्वेने गाड्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:26 PM2020-07-25T12:26:15+5:302020-07-25T12:27:40+5:30
कोरोना महामारीबाबत सर्वच प्रकारच्या माध्यमांनी त्याचा खूपच मोठा बागुलबुवा उभा केला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा पारंपरिक धार्मिक सण आहे. तो यथोचित साजरा करण्यासाठी एसटीसह कोकण रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या आरोग्याबाबत खातरजमा करून नियोजनपूर्वक गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.
कणकवली : कोरोना महामारीबाबत सर्वच प्रकारच्या माध्यमांनी त्याचा खूपच मोठा बागुलबुवा उभा केला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा पारंपरिक धार्मिक सण आहे. तो यथोचित साजरा करण्यासाठी एसटीसह कोकण रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या आरोग्याबाबत खातरजमा करून नियोजनपूर्वक गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.
परिवहन मंत्री अॅड. अनिल परब हे कोकणातील आहेत. अभ्यासू आहेत. मात्र, मंत्रिपदावर येताच त्यांना कोरोनाच्या साथीमुळे या खात्याचा अभ्यास करायला अपेक्षित वेळ मिळालेला नाही.
कोकण रेल्वेने शयनकक्ष, वातानुकूलीत डब्यांऐवजी द्वितीय श्रेणीच्या डब्यांच्या गाड्या सुरू करून गणेशभक्तांची सोय केली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांची सोय होईल. कोकणात पोहोचणारा गणेशभक्त गणेश चतुर्थीपर्वी आठ-दहा दिवस आधी पोहोचेल असे नियोजन करावे. म्हणजे त्यांच्या आरोग्याची पूर्व तपासणी करून योग्य नियोजन करणे प्रशासनाला शक्य होईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सर्वच उपनगरांतून गाड्यांचे नियोजन होणे गरजेचे
गेली काही वर्षे आम्ही एसटीने प्रवासी स्थानकांपर्यंत येण्याची वाट न बघता एसटीने प्रवाशांच्या ठिकाणी पोहोचले पाहिजे, अशी मागणी करीत आहोत. आज खासगी गाड्यांनी तसे नियोजनही केले आहे.
सध्या मुंबईत खासगी रिक्षा, टॅक्सी प्रवासी वाहतूक बंद असल्याने चाकरमानी बस स्थानकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळेच एसटीने मुंबईतील कोकणी माणसांची वस्ती असलेल्या सर्वच उपनगरांतून गाड्या सोडण्याचे नियोजन केले पाहिजे. तरच प्रवासी एसटीकडे वळतील, असेही म्हटले आहे.