corona virus : दोडामार्गमध्ये कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:32 PM2020-09-02T16:32:54+5:302020-09-02T16:34:33+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सुरूवातीला कोरोनाचे रूग्ण फारच कमी आढळत होते. मात्र, आॅगस्ट महिन्यात गेले आठ दिवस सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सुरूवातीला कोरोनाचे रूग्ण फारच कमी आढळत होते. मात्र, आॅगस्ट महिन्यात गेले आठ दिवस सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
सोमवारी नव्याने नऊ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी धाटवाडी येथील एकाच कुटुंबातील सात जण, बाजारवाडी एक तर वझरे मळेवाडी येतील एक असे आहेत. शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत.
दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या तीन रुग्णांनामुळे बाजारपेठेतील गोवा रोडवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र आता रुग्णांची वाढती संख्या पाहता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवायची की नको ? यावरून व्यापाऱ्यात मतमतांतरे चालू होती. नगरपंचायतने हा निर्णय व्यापारी संघटनेवर सोपविला आहे. त्यांच्या सहकार्यानुसार आम्ही कार्यवाही करू असे कसई- दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवाजी गायकवाड यांनी स्पष्ट केले.
दोडामार्ग तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यत्वे दोडामार्ग शहरातील वाढता आकडा नागरिकांना धास्ताऊन सोडत आहे. सोमवारी तालुक्यात नऊ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यातील आठजण दोडामार्ग शहरातील आहेत. तर एक वझरे मळेवाडी येथील एक अशी आकडेवारी देण्यात आलेली आहे.
तालुक्यातील कोरोनाची वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाला समोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. शनिवारी मिळालेल्या तीन रुग्णांमुळे बाजारपेठेतील गोवा रोडवरील सर्व दुकाने नगरपंचायत प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या सहाय्याने बंद ठेवली आहेत. मात्र, सोमवारी एकाच दिवशी शहरात आठ रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. काही व्यापाऱ्यांचे मत बाजार पेठे बंद ठेवावी तर काहींचे मत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊ नये अशी भिन्न मतांतरे चालू आहेत.
प्रशासनाने निर्णय घ्यावा : लिना कुबल
दोडामार्ग शहरात दोन दिवसांत बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. सोमवारी एकाच दिवशी आठ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने महत्वपूर्ण भूमिका निभाविणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरीकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष लिना कुबल यांनी केले आहे.
पाच दिवस बाजारपेठ बंद
शहरात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता बाजार समिती व व्यापारी यांनी सोमवारी समन्वय बैठक घेतली. या बैठकीत बाजारपेठ पुढील ५ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. रविवारपासून दोडामार्ग शहरात तब्बल १२ रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने नागरिक व व्यापारी यांनी सतर्क राहणे महत्वाचे होते. यासाठीच बाजारपेठ बंदचा हा निर्णय घेतल्याचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.