corona virus : रॅपिड टेस्ट सेंटर १ आॅगस्टपासून सुरू होणार, चाकुरकर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 06:20 PM2020-07-29T18:20:58+5:302020-07-29T18:23:17+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे १ आॅगस्टपासून कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी खारेपाटण येथे दिली.
खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे १ आॅगस्टपासून कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी खारेपाटण येथे दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नलावडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांद्रेकर, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा ताडे आदी प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना रॅपिड टेस्ट सेंटरच्या जागेची पाहणी व नियोजन करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकुरकर हे खारेपाटण येथे आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम व येथील कर्मचारीवर्गाला कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.
त्याचबरोबर खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाक्यालाही त्यांनी भेट देऊन येथील महसूल पथक, आरोग्य पथक व पोलीस यंत्रणा व्यवस्थेची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांची नोडल आॅफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. येथील एकूण ५ आरोग्य कर्मचाऱ्यांना याचे विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.