corona virus -कोरोनामुळे एस.टी.च्या उत्पन्नात घट; तोट्यात वाढ होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:18 PM2020-03-20T17:18:06+5:302020-03-20T17:19:57+5:30
कोरोना विषाणूचा प्रभाव सर्वच व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात होत असून त्याचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे.
सुधीर राणे
कणकवली : कोरोना विषाणूचा प्रभाव सर्वच व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात होत असून त्याचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे.
प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने सिंधुदुर्ग विभागाला विविध आगारातून १८ मार्चपर्यंत एस.टी.च्या ३९९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ११ हजार ६४७ किलोमीटर अंतर धावणाऱ्या गाड्या रद्द कराव्या लागल्याने २ लाख ९३ हजार २७१ रुपयांच्या उत्पन्नाला सिंधुदुर्ग विभागाला मुकावे लागले आहे.
सिंधुदुर्गातील एसटीच्या विविध आगारातील लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने उत्पन्न कमी झाले आहे.
या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांवर विविध निर्बंध घातले असून शक्यतो प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांकडूनही शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.
काहींनी खबरदारीचा उपाय योजून लग्न समारंभ, विविध धार्मिक कार्यक्रम रद्द करून घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी प्रवास करण्याचे टाळल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला असून गेल्या आठवड्यापासून उत्पन्न कमी झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
कणकवली , मालवण , सावंतवाडी , वेंगुर्ले, देवगड, कुडाळ या एसटीच्या आगारातून जिल्ह्याबाहेर प्रतिदिन फेऱ्या सुरु आहेत. परंतु अनेक नागरिकांनी लांब पल्ल्याचा प्रवास टाळल्याने अनेकवेळा बसेस नियोजित मार्गावर रिकाम्या धावताना दिसत आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या सुरु असल्याने विनाकारण इंधन खर्च होऊन उत्पन्नावर परिणाम होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत शासनाने विविध निर्बंध कायम ठेवले असून मनाई आदेश काढले आहेत. यात्रोत्सव, आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे स्थानिक फेऱ्यांच्यावेळी एसटीच्या गाड्यांमधील प्रवासी संख्याही घटत आहे.
आंगणेवाडी , कुणकेश्वर तसेच जिल्ह्यातील मोठी मंदिरेही भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जाणाऱ्या भाविकांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. यापुढील काळात एसटीचे भारमान असेच घटत राहिले तर मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.
कोरोनाचा एसटीला फटका !
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये . यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. जनतेचा प्रतिसादही त्याला लाभत आहे. या कोरोनाचा एसटीला फटका बसला आहे. अनेक प्रवासी एसटीतून प्रवास करताना मास्क तसेच रुमालाचा वापर करताना दिसत आहेत.