corona virus : मृतदेह काढून इतरत्र दफन करा, सावंतवाडी माठेवाड्यातील नागरिकांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:11 PM2020-09-07T14:11:45+5:302020-09-07T14:13:58+5:30
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे आठवडाभरापूर्वी श्रीकृष्ण महादेव गिरी यांचा मृत्यू झाल्यानंतर ते दामोदर भारती मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मठात मृतदेहाचे दफन केले होते. त्याला तेथील शेजाऱ्यांनी विरोध केला असून तो मृतदेह काढून दुसरीकडे दफन करा, अशी भूमिका घेतली आहे.
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथे आठवडाभरापूर्वी श्रीकृष्ण महादेव गिरी यांचा मृत्यू झाल्यानंतर ते दामोदर भारती मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मठात मृतदेहाचे दफन केले होते. त्याला तेथील शेजाऱ्यांनी विरोध केला असून तो मृतदेह काढून दुसरीकडे दफन करा, अशी भूमिका घेतली आहे.
नागरिकांनी त्याच दिवशी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरपालिका यांना निवेदने दिली होती. या निवेदनावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने माठेवाडा येथील नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांची नगरपालिकेत भेट घेतली.
यावेळी शहरातील माठेवाडा परिसरामध्ये राजघराण्याची स्मशानभूमी आहे. त्या पलीकडे अन्य कोणाची स्मशानभूमी नाही. हवा असेल तर तसा ठराव नगरपालिकेच्या मासिक बैठकीत घेतला जाईल. दरम्यान, मागच्या शनिवारी दफन करण्यात आलेला मृतदेह कायदेशीर मार्गाने बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन संजू परब यांनी दिले माठेवाडा येथील नागरिकांना दिले.
यावेळी नगरपालिकेकडून सल्लागार अॅड. पी. डी. देसाई, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, बंटी पुरोहित तसेच माठेवाडा येथील किरण सिद्धये, बाळ चोडणकर, प्रकाश चोडणकर, अरुण वझे, गौरव माटेकर, गणेश पेंढारकर, पुंडलिक दळवी, सुनील प्रभू केळूसकर, भूषण कुलकर्णी, प्रथमेश चोडणकर, रघुनाथ खोटलेकर, मनोहर जगताप, उदय वझे, बाळकृष्ण घाटे, हनुमंत घाटे, सुनील सांगावकर, विष्णू बांदेकर, कुणाल सावंत, विशाल पवार, दीपक सावंत, रणधीर चव्हाण, नंदू गावडे तसेच देवस्थान समितीचे वकील एस. एस. ख्वाजा आदी यावेळी उपस्थित होते.
परब म्हणाले, श्रीकृष्ण गिरी यांचा मृतदेह दफन करू नये म्हणून आम्ही पोलिसांशी चर्चा केली होती. मृतदेह कायदेशीर मार्गाने काढावा म्हणून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नगरपालिकेचे सल्लागार अॅड. पी. डी. देसाई यांच्याशी चर्चा केली होती.
प्रांताधिकाऱ्यांचा नागरिकांकडून निषेध
नगरपालिकेतील बैठकीनंतर माठेवाड्यातील नागरिक सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना भेटण्यास गेले होते. मात्र, आपण झोपलो आहे. त्यामुळे मी आता भेट देऊ शकत नाही असे या नागरिकांना प्रांताधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, अशी माहिती माठेवाडा येथील नागरिकांनी दिली.
आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी तेथे गेलो असता आम्हाला भेट दिली नाही. भविष्यात माठेवाडा परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी अधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांची राहील, असा इशारा देत नागरिकांनी प्रांताधिकारी यांचा निषेध नोंदविला. यावेळी नागरिकांनी आपली भूमिका मांडली.