corona virus -रशियन महिला कणकवलीत, यंत्रणेची उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 04:13 PM2020-03-21T16:13:45+5:302020-03-21T16:16:09+5:30
मुंबईहून गोव्याला खासगी आरामबसमधून जाण्यासाठी निघालेली एक रशियन पर्यटक महिला शुक्रवारी कणकवलीत पोहोचली. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.
कणकवली : मुंबईहून गोव्याला खासगी आरामबसमधून जाण्यासाठी निघालेली एक रशियन पर्यटक महिला शुक्रवारी कणकवलीत पोहोचली. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.
या रशियन पर्यटक महिलेने बसस्थानकासमोरील थांब्यावरून आरोग्य पथकाला हूल दिली. तसेच ती रेल्वे स्थानकात गेली. तेथे रेल्वे पोलिसांच्या साह्याने तिला ताब्यात घेण्यात आले. कणकवलीत शासकीय विश्रामगृहात आरोग्य तपासणी केल्यानंतर त्या महिला पर्यटकाची रवानगी गोवा येथे करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या सर्व सीमांवर पोलीस बंदोबस्तासह आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून सर्वच पर्यटकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. रशिया, बेलारूस येथील एक पर्यटक महिला गोवा येथे असलेल्या आपल्या पतीला भेटण्यासाठी भारतात आली आहे.
गेले काही दिवसा या महिला पर्यटकाने नेपाळ दर्शन केले. त्यानंतर गुजरात दर्शन करून ही महिला शुक्रवारी गोवा येथे खासगी आराम बसमधून जात होती. वैभववाडी तालुक्यातील करूळ चेकनाक्यावरील आरोग्य तपासणी पथकाला खासगी आरामबसमध्ये विदेशी महिला असल्याचे लक्षात आले. या पथकाने ही बाब जिल्हा आरोग्य विभागाला कळविली होती.
त्यानुसार कणकवली बसस्थानकालगतच्या थांब्यावर तालुक्यातील आरोग्य पथक सज्ज झाले होते. सकाळी ११ च्या सुमारास आरामबस कणकवलीत दाखल झाली. त्यावेळी त्या रशियन महिलेला आरोग्य पथकाचा ताफा दिसला. हे आरोग्य पथक आपलीच तपासणी करणार हे लक्षात येताच त्या महिलेने रिक्षा करून थेट कणकवली रेल्वे स्थानकात धाव घेतली. त्यामुळे आरोग्य पथकाची तारांबळ उडाली.
त्यानंतर याबाबतची माहिती तातडीने कणकवली आणि रेल्वे पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी तसेच रेल्वे स्थानकावरील आरोग्य पथकाने त्या रशियन पर्यटकाला तिथेच अडवून ठेवले.
कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्यासह आरोग्य पथकाने त्या रशियन महिला पर्यटकाला ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यानंतर कणकवली शासकीय विश्रामगृहातील विलगीकरण कक्षात तिला आणले. तिच्या तपासणीत कुठलीही लक्षणे आढळली नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या सर्वच मार्गांवर चोवीस तास आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून सर्वच पर्यटकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
संजय पोळ,
तालुका वैद्यकीय अधिकारी