corona virus : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीला कोरोना, सावंतवाडीत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:23 PM2020-08-25T16:23:37+5:302020-08-25T16:26:21+5:30
सावंतवाडी शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. यात कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. यात कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, दुसरीकडे तहसीलदार कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने तहसीलदार कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी मिळाल्यानंतर कुटीर रुग्णालयाचा प्रसुती विभागच रिक्त केला आहे. त्यामुळे रुग्णांचे चांगलेच हाल झाले आहेत.
दरम्यान सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यात दोन तलाठी व एक मंडल अधिकारी याचा समावेश आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संपूर्ण कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
दुसरीकडे सावंतवाडी कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. सदरचे वैद्यकीय अधिकारी सतत रूग्ण सेवेत असतात. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याची पत्नी मिळाल्याने ते वैद्यकीय अधिकारीही क्वारंटाईन होणार आहेत. सावंतवाडी कुटीर रूग्णालयही निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
सावंतवाडीत सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाजारपेठेतही कोरोनाच्या भितीने बाहेर पडण्यास नागरिक घाबरत आहेत. मात्र अद्यापपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
याबाबत व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश माजरेकर यांना विचारले असता त्यांनीही बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार हा मॅसेज सध्या सर्वत्र फिरत आहे. पण आम्ही असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे.
सावंतवाडीची रूग्णसंख्या पोहोचली ५८
सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या ग्रामीण भागात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी शहरात मात्र हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कारण सावंतवाडीत गेल्या चार दिवसांत चार खासगी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह मिळाले होते. तसेच काही परिचारिकांचाही समावेश होता. आतापर्यंत सावंतवाडीत ५८ रूग्ण झाले असून, त्यातील १८ जणांना यापूर्वीच घरी सोडून दिले आहे. तर ३९ रूग्ण सध्या सक्रिय आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची ओपीडी बंद
सावंतवाडी कुटीर रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची पत्नीच कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रूग्णालय प्रशासनाने सर्तकता म्हणून कुटीर रूग्णालयातील प्रसृतीसाठी आलेल्या रूग्णांना इतरत्र उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रूग्णालयच खाली केले आहे. त्यामुळे आता कुटीर रूग्णालयात फक्त पाच ते सहा रूग्ण ठेवून घेण्यात आले आहेत.
बाकीच रूग्णालय खाली करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याची आता ओपीडी ही बंद रहाणार आहे. त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव हे संपूर्ण जिल्हयात चांगले असल्याने अनेक रूग्ण जिल्हयाच्या तसेच गोव्यातून सावंतवाडीत येत असतात.