corona virus - वैभववाडी लोकोत्सव स्थगित, दत्तात्रय माईणकर यांनी केले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 03:09 PM2020-03-24T15:09:03+5:302020-03-24T15:14:56+5:30
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता.
वैभववाडी : गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता.
दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने गेली चार वर्षे सातत्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वैभववाडी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या सायंकाळी भव्य शोभायात्रेने या लोकोत्सवाला प्रारंभ होतो. लोकोत्सवात महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. लोकोत्सवाचे हे पाचवे वर्ष होते. यावर्षी २५ ते २७ या कालावधीत लोकोत्सव-२०२० आयोजित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू होते.
परंतु यंदा देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने प्रतिष्ठानने नियोजित वैभववाडी लोकोत्सव-२०२० स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी गुढीपाडव्याला शोभायात्रेसह लोकोत्सवाच्या निमित्ताने कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे दत्तकृपा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर यांनी स्पष्ट केले आहे.