corona virus : आत्महत्याग्रस्ताचे स्वॅब का घेतले?, आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:55 PM2020-09-07T14:55:49+5:302020-09-07T14:58:14+5:30
कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे रात्री उशिरा स्मशानभूमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेणाऱ्या डॉ. सचिन बर्गे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिला आहे.
वैभववाडी : कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे रात्री उशिरा स्मशानभूमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेणाऱ्या डॉ. सचिन बर्गे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात काझी यांनी म्हटले आहे की, २९ आॅगस्टला कोळपे बौद्धवाडी येथील महादेव सखाराम कांबळे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणला. परंतु तेथील डॉक्टर सचिन बर्गे यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. उमेश पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
मृताचे नातेवाईक मुंबईवरून येणार असल्यामुळे अंत्यविधी करण्यास वेळ लागला. दरम्यान, त्याच रात्री दीड वाजता डॉ. बर्गे यांनी स्मशानभूमीत जाऊन मृताचे स्वॅब घेतले. या सर्व प्रकारामुळे कोळपे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्वॅब त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून घेतला.
स्वॅब घेण्यापूर्वी त्यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या सर्व प्रकाराची चौकशी करून डॉ. बर्गेंवर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काझी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आहे.
कोळपे हा गाव कंटेन्मेंट झोन आहे. लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने वरिष्ठांच्या सल्ल्याने व पूर्वपरवानगीने त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. त्यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढून मला नाहक त्रास देण्यात येत आहे. ज्यादिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी माझी ड्युटी नव्हती; तरीसुद्धा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी माझ्याकडून कटरचे काम करून घेतले.
वेगवेगळ्या पद्धतीने मला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यासंदर्भात मी त्यांच्याविरोधात २४ आॅगस्टला पोलिसांत तक्रार अर्ज दिलेला आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बर्गे यांनी स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील हे आपल्यावर पाळत ठेवणे, त्रास होईल असे कृत्य करणे असे प्रकार वारवांर करीत असल्याचा तक्रार अर्ज डॉ. बर्गे यांनी पोलिसांत दिला आहे.
वरिष्ठांना अहवाल दिला आहे : डॉ. पाटील
डॉ. सचिन बर्गे हे ग्रामीण रुग्णालयात काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा माझा संबंधच येत नाही. परंतु कोळपे प्रकरणात ते चुकीचे वागले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांच्या समक्ष माफी मागितली आहे. स्वॅब घेण्याच्या काही पद्धती प्रशासनाने निश्चित केलेल्या आहेत. त्या पद्धतीनुसारच काम करावे लागते. डॉ. बर्गे यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आरोग्य विभाग बदनाम झाला आहे. याबाबतच वरिष्ठांना अहवाल देण्यात आलेला आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी सांगितले.