corona virus : कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 06:36 PM2020-09-10T18:36:31+5:302020-09-10T18:38:09+5:30
कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची अजूनही गरज आहे.
सुधीर राणे
कणकवली : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची अजूनही गरज आहे.
एखाद्याला साथीचा आजार झाला आणि तो जर रुग्णालय अथवा खासगी दवाखान्यात उपचारांसाठी गेला , तर त्याला प्रथम कोरोनाची चाचणी करण्यास अनेक डॉक्टरांकडून सांगितले जाते. रुग्ण अगोदर त्याला होणाऱ्या त्रासाने बेजार असतो .
अशा अवस्थेत ' कोरोनाची चाचणी करा ' म्हटल्यानंतर तो निम्मा गारद होतो. त्याच्या मनामध्ये चाचणी अहवाल ' पॉझिटिव्ह ' तर येणार नाही ना ? याची भीती असते . अशा भीतीमुळेसुद्धा कोरोना ' निगेटिव्ह ' असणारे रुग्ण ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
इतर आजारावर उपचार घ्यायचे झाले , तर नागरिकांनी कुठे जायचे ? आणि हे उपचार घेतांना त्यांना कोरोनाची चाचणी करावी लागणार का ? या गोष्टीही आरोग्यविभागाने स्पष्ट करण्याची गरज आहे .
पावसाळ्यातील वातावरणामध्ये हवामानात पालट होतो . अनेक नागरिक कामानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांचे कधी कधी पावसात भिजणे होते . त्यामुळे सर्दी , खोकला आणि ताप यांचा त्रास होतो . कोरोनामध्येही ही लक्षणे असल्यामुळे नागरिकांमध्ये याविषयी भीती आहे . ती दूर करण्यासाठी शास्त्रीय दृष्टकोणातून कोरोनाबाबतची परिपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे.
कोरोनामुळे अन्य साथीचे रोग तसेच हृदयरोग , मधुमेह यांसारख्या अन्य आजारांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे . सर्दी , ताप , खोकला यांसारखे आजार तसेच डेंग्यू , मलेरिया यांसारख्या आजारांत पावसाळ्यात अधिक भर पडते . या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी कोणत्या रुग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे ? याविषयी नागरिक अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट जाणवत आहे .
शासनाने कोरोनासमवेत अन्य आजारांवरील उपचारांसाठी राज्यातील संबंधित शासकीय रुग्णालये तसेच खासगी रुग्णालये यांना सूचना देऊन उपचारांची सोय करावी अन्यथा कोरोनाच्या ऐवजी अन्य साथीच्या आजाराने उपचारांविना रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागेल.