corona virus : यावर्षी मुंबईकरांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर मुंबईतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:32 PM2020-08-13T18:32:30+5:302020-08-13T18:33:45+5:30
चाकरमान्यांना आम्ही केलेले आवाहन पटले असून, मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये येण्याचे टाळले आहे, असे मत खासदार विनायक राऊत यांनी मांडले.
सावंतवाडी : शिवसेना नेहमी समाजकारण करीत आली आहे. हे समाजकारणाचे व्रत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्हांला मिळाले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून अशाप्रकारे लोकांप्रती आपलेपणा बाळगला जातो. याचे हे जिवंत उदाहरण आहे. चाकरमान्यांना आम्ही केलेले आवाहन पटले असून, मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये येण्याचे टाळले आहे, असे मत खासदार विनायक राऊत यांनी मांडले.
शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या पुढाकारातून तालुक्यातील निराधार व दारिद्र्यरेषेखालील तब्बल दोनशे कुटुंबांची वीज बिले शिवसेनेच्यावतीने अदा करण्यात आली आहेत. ही बिले भरण्यात आली येऊन त्यांच्या पावत्यांचे वाटप खासदार राऊत यांच्या हस्ते ग्राहकांना करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विक्रांत सावंंत, विकास कुडाळकर, रूची राऊत, भरत पंडित, महिला तालुकाप्रमुख रश्मी माळवदे, अपर्णा कोठावळे, सचिन वालावलकर, शब्बीर मणियार, महेश शिरोडकर, अशोक दळवी, विनोद काजरेकर, सुनील गावडे, अनिल जाधव, योगेश नाईक, संजय माजगावकर आदी उपस्थित होते.
शैलेश परब म्हणाले, शिवसेना संघटना कायम गोरगरिबांच्या मदतीला धावत असते. शिवसेनाप्रमुखांनी ती शिकवण दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील दोनशे ग्राहकांची वीज बिले परस्पर जमा केली आहेत. लोक आर्थिक संकटात आहेत. कोरोना युद्धात शत्रू समोर दिसत नसला तरी लोक विवंचनेत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही वीज बिले भरली आहेत. शिवसेनाप्रमुखांची ८० टक्के समाजकारण ही शिकवण आहे.
विक्रांत सावंत व संजय पडते यांनी शैलेश परब व रुपेश राऊळ यांच्या टीमचे कौतुक केले. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर लोक आर्थिक विवंचनेत असताना शिवसेनाप्रमुखांच्या ८० टक्के समाजकारणाचा संदेश घेऊन हे काम केले आहे, असे मी मानतो. वीजबिले भरून एक चांगला संदेश देण्यात आला आहे, असे ते म्हणाले. यावेळी दोनशे ग्राहकांना बिल भरलेल्याची पावती खासदार राऊत यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले तर आभार अनिल जाधव यांनी मानले.