coronavirus : लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेले ३५ युवक-युवती सिंधुदुर्गात परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 10:00 AM2020-03-28T10:00:48+5:302020-03-28T10:07:01+5:30
उर्वरित नागरिकांनाही टप्प्याटप्याने आणण्यात येणार आहे. हे युवक-युवती गोव्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होते.
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या कर्फ्यूमुळे गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील युवक-युवतींचे शनिवारी सकाळी दोडामार्ग सीमेवर आगमन झाले. स्थानिक शिवसेना नेत्यांच्या प्रयत्नांतून ३५ युवक-युवतींना खासगी बसमधून आणण्यात आले. उर्वरित नागरिकांनाही टप्प्याटप्याने आणण्यात येणार आहे. हे युवक-युवती गोव्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होते.
दोडामार्गचे शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून या युवकांना आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या युवक-युवतींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना दोडामार्गमध्ये घेण्यात आले आहे.
दरम्यान, गोव्यात शेकडो सिंधुदुर्गवासीय अडकून पडले असून त्यांच्या मुक्ततेसाठी शासन पातळीवर हेल्पलाइनच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. हे नागरिक गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत असल्यामुळे व त्यांच्याशी संपर्क साधणे शक्य नसल्यामुळे हेल्पलाइनची व्यवस्था करणे गरजेचे आहे.