CoronaVirus : जिल्हा कोरोनामुक्तीसाठी अॅक्शन प्लॅन,नीतेश राणे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:49 PM2020-05-28T17:49:15+5:302020-05-28T17:53:46+5:30
कणकवली : सिंधुदुर्ग कोरोनामुक्त करण्यासाठी हा अॅक्शन प्लॅन असून जनतेने त्याला साथ द्यावी, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी येथे ...
कणकवली : सिंधुदुर्ग कोरोनामुक्त करण्यासाठी हा अॅक्शन प्लॅन असून जनतेने त्याला साथ द्यावी, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.
आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या १० लाख आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे जिल्ह्यात वाटप करण्याचा संकल्प केला आहे. त्याचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील ५ लाख गोळ्यांचे वाटप कणकवली तालुक्यातून सुरू करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त व्हावा हे माझे स्वप्न आहे, असे राणे म्हणाले. ओसरगांव येथील महिला भवन येथे ते बोलत होते. यावेळी वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे डॉ. श्रीराम हिर्लेकर तसेच मनीष दळवी उपस्थित होते.
यावेळी राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा आॅरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये यायला हवा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि तापसरी डोके वर काढत असते. तर हीच कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे यासाठीच रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्या जिल्ह्यातील प्रत्येक लहान-थोर नागरिकाला देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोळ्या तयार करताना पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्येक जिल्हावासीयाला या होमिओपॅथी गोळ्या देण्यात येणार आहेत. एकदा गोळ्यांचे वाटप केल्यानंतर एक महिन्यानंतर पुन्हा दुसऱ्या डोसचे वाटप केले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या टीमचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.
यावेळी डॉ. श्रीराम हिर्लेकर म्हणाले, केवळ कोरोनाच नव्हे तर पावसाळ्यात होणारे व्हायरल इन्फेक्शन या गोळ्यांमुळे दूर होईल. सकाळी उपाशीपोटी तीन गोळ्यांचा सलग ३ दिवस डोस घ्यावा लागेल. हे औषध घेतल्यानंतर कॉफी पिऊ नये. या डोसमुळे एक महिनाभर रोगप्रतिकारकशक्ती टिकेल.
महिन्यानंतर पुन्हा या गोळ्यांचा डोस घ्यावा. गोळ्या वाटप करताना मूळ सिंधुदुर्गवासीय, होम क्वारंटाईन आणि संस्थात्मक क्वारंटाईन असा तीन पद्धतीने डाटा गोळा केला जाणार आहे.
असा डाटा देशात प्रथमच तयार केला जात असेल. त्यामुळे आमदार नीतेश राणेंच्या या उपक्रमाची जागतिक आरोग्य संघटनेलाही दखल घ्यावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, या गोळ्या पॅकिंग कशा करतात? याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.
चार केंद्रे स्थापन
आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्या आपले रक्षण निश्चितच करतील. या गोळ्या तयार करताना पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात चार केंद्रांवर या गोळ्या तयार होत आहेत.
वेंगुर्ला, सावंतवाडी, ओसरगाव महिला भवन आणि हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गोळ्यांचे पॅकिंग सुरू आहे. प्रत्येक घरी जाऊन स्वयंसेवक या गोळ्या घरपोच करतील. तसेच संबंधित व्यक्तींची नावे नोंद करून कुटुंबप्रमुखाची सही नावांच्या यादीवर घेणार आहेत, असेही नीतेश राणे यावेळी म्हणाले.