Coronavirus: सावंतवाडीत मोक्याच्या ठिकाणी मद्यपान; दुचाकीतून खुलेआम दारू विक्री सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 12:20 PM2020-05-21T12:20:40+5:302020-05-21T12:21:27+5:30
एखाद्या व्यक्तीला गोव्यात जायचे झाले तर त्याला ई पास लागतो पण अवैध दारू व्यावसायिकांना ना ई पास, ना कोण अडवत त्यामुळे ही दारू सिंधुदुर्गात येत आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील मोक्याची ठिकाणे सध्या तळीरामांचे अड्ड बनत असून, लॉकडाऊन असतानाही गोव्यातून येणारी अवैध दारू आणि खुलेआम होणारी अवैध दारूविक्री यामुळे तळीरामांची चांदीच झाली आहे. या सगळ्याकडे पोलीस हेतू पुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. शहरातील महत्त्वाच्या नाक्यावर काही युवक दुचाकीमध्ये दारूच्या बाटल्या ठेऊन थेट विक्री करतात. नेहमीच्या ग्राहकांना या विक्रेत्यांची माहिती असल्याने ते त्यांच्याकडूनच दारू खरेदी करत असतात. ही सर्व दारू गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येत असते. महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीला गोव्यात जायचे झाले तर त्याला ई पास लागतो पण अवैध दारू व्यावसायिकांना ना ई पास, ना कोण अडवत त्यामुळे ही दारू सिंधुदुर्गात येत आहे.
सावंतवाडीत तर खुलेआम दारू विक्री होत असतेच. पण आता मोक्याची ठिकाणेही तळीरामांचे अड्डे झाले आहेत. पोलिसांनी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले खरे पण या कॅमेºयांचा उपयोग शोभेचे बाहुले कसे झाले आहे. तळीरामांच्या मोक्याच्या ठिकाणावर चार ते पाच युवकांचा समुह एकत्र येत मद्यपान करत असतो. मात्र याकडे पोलिसांचाही दुर्लक्ष होत आहे. सावंतवाडी शहरातील शासकीय धान्य गोडावूनच्या मागे तसेच त्याच्या समोर रात्रीच्या वेळी काही मद्यपी मद्यपान करून तेथेच दारूच्या बाटल्या टाकतात. सध्या नरेंद्र डोंगरावर मद्यपान करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण शहरातील मोक्याच्या ठिकाणी मद्यपींची गर्दी वाढू लागली आहे. हीच शहरातील नागरिकांची डोकेदुखी होत आहे.
पोलिसांना याबाबत माहिती देऊनही पोलीस कारवाई करत नाही, असेच नागरिक सांगत आहेत. दोन दिवसापूर्वी तर येथील गोडावूनच्या जवळ मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. या दारूच्या बाटल्या तेथे आल्या कशा, हे पोलिसांच्या सीसीटिव्ही मध्ये दिसत असूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकारात आता थेट पोलीस अधीक्षकांनी तरी लक्ष घालावा जेणे करून मद्यपींना एक जरब बसू शकेल, असे नागरिकांना वाटत आहे.
अत्यावश्यक सेवेच्या पासचा गैरवापर
सावंतवाडीत सुरूवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात दुचाकींना वेगवेगळ्या कारणासाठी अत्यावश्यक सेवेचा पास देण्यात आला खरा पण या पासचा काहींनी गैरवापर करत अवैध दारूची मोठ्या प्रमाणात वाहातूक केल्याचे दिसून आले. अजूनही काही जण याच अत्यावश्यक पासचा गैरवापर करत आहेत. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.