CoronaVirus : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करा, निमाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:14 PM2020-06-05T17:14:27+5:302020-06-05T17:15:49+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र स्टुडंट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सावंतवाडी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र स्टुडंट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पहिली सुरक्षा नंतर परीक्षा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. जर आपण सुरक्षेची हमी देत नसाल तर परीक्षा रद्द कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक मंडळ, आयुर्वेद संचालक, आयुर्वेद अधिष्ठाता यांना पाठविल्या आहेत.
महाराष्ट्र स्टुडंट फोरमने पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोविड-१९ च्या वैश्विक महामारीमुळे देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे.
अशा परिस्थितीमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत. परंतु कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी चिंताग्रस्त झालेले आहेत. अद्यापही विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात परीक्षा घेणार अथवा नाही याबद्दल विद्यार्थ्यांना कल्पना दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांची संदिग्ध अवस्था झालेली असून चिंता वाढली आहे.
स्टुडंट फोरम, महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्रातील आयुर्वेद तसेच इतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. हा संवाद साधताना विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात निमा स्टुडंट फोरम, महाराष्ट्र राज्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या सर्व मागण्या लेखी निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत.
या मागण्यांमध्ये वैद्यकीय शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असेल तर वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी सोशल डिस्टन्स परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे पाळावयाचे आहे तसेच परीक्षा केंद्रावर काय सुरक्षा देणार आहात? यासंदर्भात विद्यापीठाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असेही या निवेदनात म्हटले आहे.