CoronaVirus : रत्नागिरीत कोरोना तपासणी होणार, सिंधुदुर्गातही लॅब लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 04:10 PM2020-05-26T16:10:08+5:302020-05-26T16:18:34+5:30
कोरोना तपासणीसाठी रत्नागिरीतील लॅबसाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून, ही लॅब येत्या महिनाभरात सुरु होईल. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही लॅब व्हावी यासाठीचा प्रस्ताव आज तयार केला असून, तो मान्यतेसाठी राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्याचे निश्चित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना तपासणी लॅब लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सिंधुदुर्गनगरी : कोरोना तपासणीसाठी रत्नागिरीतील लॅबसाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून, ही लॅब येत्या महिनाभरात सुरु होईल. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही लॅब व्हावी यासाठीचा प्रस्ताव आज तयार केला असून, तो मान्यतेसाठी राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्याचे निश्चित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना तपासणी लॅब लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या नियोजन समिती सभागृहात ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सेना जिल्हाप्रमुख संजय पडते आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता याठिकाणीही कोरोना तपासणीची लॅब असणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता त्यांनी सिंधुदुर्गातही या लॅबसाठीचा प्रस्ताव तयार करून पाठवून द्यायला सांगितले आहे. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यातल्या लॅबसाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी साधारण ६० लाख ते १ कोटी ७ लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.
हा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्याचे निश्चित केले आहे. परिपूर्ण प्रस्ताव राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन ते चार दिवस जातील. रत्नागिरीतील कोविड-१९ तपासणी लॅब मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहे. ही लॅब कार्यान्वित होण्यासाठी एक महिना लागेल. त्यानंतर आपल्याकडून तपासणीसाठी रत्नागिरीला नमुने पाठविण्यात येतील. मात्र, त्यानंतर काहीच कालावधीत आपल्याकडेही लॅब तयार होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात चाकरमानी दाखल झालेले आहेत. हे कोणी आणले, ते कसे आले याच्या वादात न पडता सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना या रोगाचा मुकाबला करण्यासाठी ठामपणे उभे केले पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
कोरोना रुग्णांचे अहवाल अगोदरच बाहेर पडतात. हे अहवाल नावासह बाहेर पडतात, ही गोष्ट योग्य नाही.
प्रिंटींग चुकीमुळे एका युवतीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र तो तत्काळ बदलून निगेटिव्ह आला. ही प्रिंटिंग चूक कोल्हापूरची आहे. तरीही याची जबाबदारी आमचीच आहे असे आम्ही मानतो. मात्र, हे अहवाल नावासह बाहेर येणे योग्य नाही. कोरोना कायद्यानुसार रुग्णाचे नाव जाहीर करणे हा गुन्हा आहे. अहवाल बाहेर आल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दाखल केली आहे. त्यामुळे त्याची सविस्तर तपासणी केली जाईल व संबंधितावर कारवाई केली जाईल, असे सांगतानाच लोकप्रतिनिधींसाठी मात्र असे प्रकार योग्य नाहीत. असे प्रकार झाले असल्यास त्यांनी मला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना याची कल्पना द्यावी. मात्र, त्यांनी तसे न करता समाज माध्यमांवर जाहीर केले.
हे योग्य नाही असा टोलाही सामंत यांनी नाव न घेता आमदार नीतेश राणे यांना लगावला. त्याचप्रमाणे ई-पास संदर्भातील प्रश्नाला उत्तर देतानाही राणे यांनी आम्हांला याचे मूळ माहीत असेल तर सांगाव. आपण तत्काळ कारवाई करतो. मात्र, केवळ वरवरचे आरोप करूनये, असा सल्लाही दिला.
यावेळी पालकमंत्री सामंत यांचे अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेसाठी २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी एकही रुपया आला नाही. या वर्षासाठी २९० लाभार्थी मंजूर असून अनेक लाभार्थ्यांनी उसने पैसे घेऊन घराची कामे केली आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले.
जिल्ह्यात ८२ ते ८५ हजार चाकरमानी दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ८२ ते ८५ हजार लोक दाखल झाले आहेत.
यातील बत्तीस हजार व्यक्ती या ३१ एप्रिलपर्यंत आल्या होत्या तर आजपर्यंत मे महिना सुरू झाल्यापासून ४० हजार ५२७ एवढे लोक दाखल झाले आहेत.
यातील काही लोक संस्थात्मक अलगीकरणात तर काही लोक घरी अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता रुग्ण वाढण्याची शक्यता आहे आणि हे मी प्रामाणिकपणे सांगत आहे. त्यामुळे आता खरी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे, असे उदय सामंत म्हणाले.
लवकरच बैठक घेणार
पुढील कालावधीत गणपती हा सिंधुदुर्गातील महत्त्वाचा सण येत आहे. या सणासाठीही सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येणार आहेत. मात्र, हा सणही कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर घरीच साजरा करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या कालावधीत काय काय काळजी घ्यावी लागेल याची चर्चा झाली असून लवकरच बैठक घेऊन गणेश चतुर्थीचे नियोजन करण्यात येणार आहे.