CoronaVirus :आंब्याची स्वत:च विक्री करून नव्या पॅटर्नची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:31 PM2020-06-08T12:31:10+5:302020-06-08T12:33:56+5:30
देवगड हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरूवातीलाच यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासमोर उभे राहिले. मात्र, कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही आलेल्या संकटातून खचून जात नाही. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. याची प्रचिती देखील आंबा व्यावसायिकांनी करून दिली. आलेल्या संकटाला तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बागायतदारांनी आपल्या बागांमधील आंबा स्वत:च विक्री करुन एकनवा पॅटर्नची निर्मिती केली. कोरोना संकटामुळे देवगड मधील आंबा बागायतदार आत्मनिर्भय बनले.
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : देवगड हापूस आंब्याच्या हंगामाच्या सुरूवातीलाच यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासमोर उभे राहिले. मात्र, कोकणातील शेतकरी, बागायतदार कधीही आलेल्या संकटातून खचून जात नाही. तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. याची प्रचिती देखील आंबा व्यावसायिकांनी करून दिली. आलेल्या संकटाला तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बागायतदारांनी आपल्या बागांमधील आंबा स्वत:च विक्री करुन एकनवा पॅटर्नची निर्मिती केली. कोरोना संकटामुळे देवगड मधील आंबा बागायतदार आत्मनिर्भय बनले.
संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्ये या विषाणूने मार्च महिन्यामध्येच शिरकाव केला. त्यामुळे देशामध्ये २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे ऐन आंबा मौसमातच बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले.
बाजारपेठा बंद, वाहतूक बंद, लोक घरांमध्ये अडकून पडलेले मग आंब्याची विक्री करायची कशी? त्यातच सर्वात मोठी स्थानिक बाजारपेठ असलेले नवीमुंबईतील वाशी मार्केट बंद झाल्याने आंबा बागायतदारांसमोर एक आव्हानच निर्माण झाले. मात्र, विदर्भ मराठवाड्यातील शेतक-यांप्रमाणे कोकणातील शेतकरी कधीही खचून जात नाही. कोकणातील शेतक-यांनी कर्जापोटी किवा नापिक शेत झाल्यामुळे आत्महत्या केल्याची नोंद नाही. त्यामुळे त्या इतिहासाची पुनरावृत्ती करून बागायतदारांनी कोरोनावर मात केली.
दलाली संपुष्टात
देवगडमधील आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करुन महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या शहरांमधील मागणी नुसार घरपोच आंबा पेटीचा पुरवठा केला आहे. यामुळे आंबा विक्रेचे शेतकरी ते थेट ग्राहक असे समीकरण बनले. या समीकरणाने दलाली पूर्णपणे संपुष्टात आली. त्याचा फायदा थेट आंबा बागायतदारांना झाला आहे.
स्वत: पिकविलेला माल स्वत:च विक्री केल्यामुळे आंबा बागायतदारांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. कोकणी शेतक-यांच्या पाठीशी व आंबा बागायतदारांच्या पाठीवर हात थोपटणारे राजकीय पाठबळ नसताना सुध्दा कोकणातील शेतकरी व बागायतदार कधीही खचून गेलेला नाही, हे त्याने सिद्ध केले.
आंबा पेटीला सर्वाधिक भाव
यावर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होणार हे दिसत होते. मात्र, या संकटासमोर येथील बागायतदार हे ध्येयाने उभे राहिले. कोरोना विषाणूच्या काळातही आंब्याच्या पेटीला चांगला भाव मिळाला. आतापर्यंतच्या इतिहासात तो सर्वाधिक होता.
शेकडो टन आंब्याची मुंबई, पुणेत विक्री
देवगडसह जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांनी शासनाकडून अत्यावश्यक सेवेतील परवाना मिळवून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळातही मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पुणे, कोल्हापूर या सारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्थांमध्ये आंब्याची विक्री केली आहे. या थेट आंबा विक्रीमुळे त्याचा फायदा स्थानिक बागायतदार, शेतकऱ्यांना झाला आहे.