CoronaVirus : गाळेल परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 03:30 PM2020-06-12T15:30:59+5:302020-06-12T15:31:42+5:30
बांदा परिसरात बांदा, डेगवे, असनिये, सातोसेत प्रत्येकी १ आणि गाळेल येथे मंगळवारी रात्री उशिरा दोन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. बांदा परिसरात एकूण कोरोना बाधितांची संख्या ६ झाली आहे. गाळेल-मधलीवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन असलेले वडील व मुलगा असे दोघेजण कोरोना बाधित आढळल्याने गाळेल परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाला आहे.
बांदा : बांदा परिसरात बांदा, डेगवे, असनिये, सातोसेत प्रत्येकी १ आणि गाळेल येथे मंगळवारी रात्री उशिरा दोन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. बांदा परिसरात एकूण कोरोना बाधितांची संख्या ६ झाली आहे. गाळेल-मधलीवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन असलेले वडील व मुलगा असे दोघेजण कोरोना बाधित आढळल्याने गाळेल परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाला आहे.
बांदा पोलिसांनी गाळेल प्राथमिक शाळेपासून ३०० मीटरपर्यंतचा परिसर बुधवारी सायंकाळी सील केला. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या पत्नीचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. ते कुटुंब मुंबईहून आल्यानंतर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले होते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
गाळेल येथील मुंबईहून आलेल्या पती, पत्नीसह मुलाला प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. दोन दिवसांपासून वडील व मुलगा यांना ताप व खोकला येत असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोघांचाही स्वॅब अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली असून सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी ३०० मीटरपर्यंतचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी उशिरा ३०० मीटरपर्यंतचा परिसर सील केला आहे. आरोग्य विभागाकडून अती जोखमीत असलेल्या पत्नीचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. अजूनही रुग्णांच्या संपर्कात कोणी आले होते का याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.