CoronaVirus :उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:58 PM2020-05-27T16:58:40+5:302020-05-27T17:00:12+5:30

अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते.

CoronaVirus: How do we work on an empty stomach ?, Bihari workers question the administration | CoronaVirus :उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्न

आपल्या गावी जाण्यासाठी बिहारी कामगारांनी कणकवली बसस्थानकात गर्दी केली होती. मात्र, ठेकेदाराने कामाचे पूर्ण पैसे न दिल्याने ठेकेदारासोबत त्यांचा स्थानकातच वाद सुरू झाला होता.

Next
ठळक मुद्देउपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे?, बिहारी मजुरांचा प्रशासनाला प्रश्नघरी जाण्याचा केला हट्ट, ओरोस येथे जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांची सोय, बसस्थानकातच वाद

कणकवली : अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते.

घरी परत जाण्यासाठी या बिहारी कामगारांनी आपले सर्व साहित्य घेऊन कणकवली बसस्थानक गाठले होते. या बसस्थानकातून ओरोस येथे जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांची सोय करण्यात आली होती. तेथून रेल्वेने हे बिहारी मजूर आपल्या गावी जाणार होते. पण कामाचे पूर्ण पैसे न मिळाल्याने व नियोजित काम अजून शिल्लक असल्याने त्यांचा व महामार्ग चौपदरीकरण कामाचा पोट ठेकेदार यांचा बसस्थानकातच वाद झाला.

अखेर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी मध्यस्थी करीत मजुरांची समजूत काढून त्यांना महिनाभर कणकवलीत थांबण्यास सांगितले.

ओरोसवरून सोमवारी श्रमिक रेल्वे बिहारला निघणार असल्याने त्या गाडीतून आपल्या गावी जाण्यासाठी अनेक मजूर कणकवली बसस्थानकात दाखल झाले होते. महामार्ग चौपदरीकरण कामाचा पोट ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुमारे २०० कामगारांना कणकवली बसस्थानकातून सिंधुदुर्ग रोड रेल्वेस्थानकापर्यंत घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तिथे उपस्थित होते.

याचवेळी तिथे दाखल झालेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठेकेदाराने या कामगारांना कणकवलीत काही दिवस थांबण्याचे आवाहन केले. यावरून ठेकेदार व मजूर यांच्यात वाद सुरू झाला. याचवेळी काही मजुरांना एसटी बसमधून त्यांनी खाली उतरविले.

अखेर तहसीलदार आर. जे. पवार यांनी हस्तक्षेप करून तत्काळ जेवणाची व्यवस्था करण्याची ताकीद ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच ठेकेदाराऐवजी थेट कामगारांना मजुरी द्या, असे त्यांना बजावले. तसेच मजुरांना अर्धवट स्थितीतील पुलाचे काम पूर्ण करून मग तुम्ही निघून जा, असे सांगितले.

१५ जूनला तुम्हांला घरी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासनही त्या मजुरांना दिले. त्यामुळे मजूर काहीसे शांत झाले. मजूर घर गाठण्यासाठी आहेत प्रयत्नशील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर गरीब कामगार, मजूर आपले घर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक परप्रांतीय मजूर रेल्वेतून आपल्या राज्यात परतले आहेत.
सध्या कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी शेकडो परप्रांतातील मजूर तिथे कार्यरत आहेत.
 

Web Title: CoronaVirus: How do we work on an empty stomach ?, Bihari workers question the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.