CoronaVirus : भाजपा कोविड समिती काढणार समस्यांवर उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 02:46 PM2020-06-09T14:46:54+5:302020-06-09T15:01:22+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाबत गावपातळीवर सरपंच व कृती समिती योग्य काम करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून ग्रामकृती समितीला सहकार्य मिळत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद विषय समिती सभापती व तालुका पंचायत समिती सभापतींकडे प्रत्येक तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कणकवली : जिल्ह्यात कोरोनाबाबत गावपातळीवर सरपंच व कृती समिती योग्य काम करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून ग्रामकृती समितीला सहकार्य मिळत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद विषय समिती सभापती व तालुका पंचायत समिती सभापतींकडे प्रत्येक तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गावागावात जाऊन सरपंच व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून त्यावर जिल्हा भाजपच्यावतीने योग्य उपाययोजना केल्या जातील. तसेच सध्या निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी आत्मनिर्भर योजनेतून उपाययोजना करून जिल्ह्यात भाजपा आक्रमकपणे काम करणार आहे, असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.
तेली म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कोविड समन्वय समिती व तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत कणकवली येथे बैठक झाली. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा परिषद विषय समिती सभापती, पंचायत समिती सभापती, जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष आदी उपस्थित होते. १०८ रुग्णवाहिका काही वेळा उपलब्ध होत नाही. यासाठी भाजपाच्यावतीने रुग्णवाहिका उपलब्धतेसह टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.
जिल्ह्यात कोविडबाबत गावपातळीवर सरपंच व कृती समिती योग्य काम करीत आहे. मात्र, प्रशासनाकडून ग्रामकृती समितीला सहकार्य मिळत नाही. यासाठी प्रत्येक तालुक्याची जबाबदारी भाजपाच्या जिल्हा परिषद विषय समिती सभापती आणि तालुका पंचायत समिती सभापतींकडे सोपविण्यात आली आहे.
गावागावात जाऊन सरपंच व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार असून नंतर यावर जिल्हा भाजपाच्यावतीने उपाययोजना करण्यात येणार आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून लोकांना बाहेर काढण्यात येईल.
पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या इनिंगची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या इनिंगच्या वर्षपूर्तीचे ३० मे ते ३० जूनपर्यंत अभियान सुरू असणार आहे, असेही तेली म्हणाले.
वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देणार
मोदी सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती तळागाळातील घटकांना देण्यात येणार आहे. कोकण विभागात दीड लाख लोकांची व्हर्च्युअल सभा होणार आहे. सत्ताधारी जरी भाजपाला जिल्ह्यात डावलत असले तरी जिल्ह्यात भाजपा आक्रमक पद्धतीने काम करणार आहेत.
जिल्ह्यातील ८० टक्के सत्तास्थाने भाजपाकडे आहेत. सावंतवाडी विभागात आणखी १० लाख होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करणार. आमदार नीतेश राणेंच्या माध्यमातून १० लाख गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे. एकूण २० लाख गोळ्यांचे वाटप जिल्ह्यात भाजपा करणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.