CoronaVirus Lockdown : मुळ गावी जाण्यासाठी 16 हजार 934 नागरिकांनी केली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 06:52 PM2020-05-07T18:52:00+5:302020-05-07T18:53:53+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या लिंकवर आजपर्यंत एकूण 16 हजार 934 नागरिकांनी नोंद केली आहे. त्यापैकी जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 8 हजार 174 व्यक्तींनी नोंद केली आहे. तर परराज्यात जाण्यासाठी 8 हजार 760 व्यक्तींचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या लिंकवर आजपर्यंत एकूण 16 हजार 934 नागरिकांनी नोंद केली आहे. त्यापैकी जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 8 हजार 174 व्यक्तींनी नोंद केली आहे. तर परराज्यात जाण्यासाठी 8 हजार 760 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने 110 पासेस दिले आहेत. तर 71 व्यक्तींना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेशमधील 24, तेलंगणामधील 11, राजस्थानमधील 12 जणांना दि. 5 मे रोजी रवाना करण्यात आले तर आज रोजी रायगड जिल्ह्यातील 13 व मालवण व वैभववाडी तालुक्यातून राजस्थान मधील एकूण 11 जणांना रवाना करण्यात आले आहे.
गोवा राज्यात अडकलेल्या जिल्ह्यावासियांना जिल्ह्यात परतण्यासाठी पास देण्यात आले असून सदर लोक जिल्ह्यात दाखल होत आहेत. आतापर्यंत गोवा राज्यातून सुमारे 317 व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
याव्यक्ती एस.टी. बस तसेच खाजगी वाहनाने आलेल्या आहेत. तर गोव्यातील 98 व्यक्ती एस.टी बसने व 30 व्यक्ती खाजगी वाहनाने उद्या जिल्ह्यात येणार आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातूनही नागरिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजमितीस एकूण 555 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 341 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर 214 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण 628 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 594 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 3 नमुने पॉजिटीव्ह आले असून 591 नमुन्यांचा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे.
सद्य स्थितीत जिल्ह्यात 4 कोरोना बाधीत रुग्ण असून त्यापैकी एका रुग्णावर औषधोपचार करून फेर तपासणी अंती त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यास घरी सोडण्यात आले आहे. तर 2 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विलगीकरण कक्षामध्ये आजमितीस एकूण 65 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 43 रुग्ण हे कोव्हीड रुग्णालयात व 22 रुग्ण हे कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य विभागामार्फत आज एकूण 4328 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
नव्याने रुग्ण आढळलेल्या वायंगणी गावालगतचा तीन किलोमीटरचा परिसर कंन्टेन्मेंट झोन म्हणून निश्चित करण्यात आला आहे. कन्टेन्मेंट झोन क्षेत्रात एकूण तीन गावे व वाड्यांचा समावेश होत असून या ठिकाणी 23 सेक्टर पाडून त्यानुसार तपासणी करण्यात येत आहे.
एकूण 4 हजार 782 नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. सेक्टर निहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्यात आली आहे.
अतिजोखमीच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर कमी जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्या रुग्णाच्या गावामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनाची कार्यवाही आरोग्य यंत्रणेकडून तात्काळ सुरू करण्यात आली आहे.