CoronaVirus Lockdown :कमळ थाळी ! माणुसकीच्या भावनेतून रोज २०० जणांना मोफत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:14 AM2020-04-20T11:14:40+5:302020-04-20T11:19:00+5:30

कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे माणुसकीच्या भावनेतून दररोज गरजवंतांची मोफत भोजनाची व्यवस्था करीत आहेत. या उपक्रमाचे 'कमळ थाळी ' असे नामकरण करण्यात आले आहे.

CoronaVirus Lockdown: | CoronaVirus Lockdown :कमळ थाळी ! माणुसकीच्या भावनेतून रोज २०० जणांना मोफत जेवण

कणकवली येथील लक्ष्मी विष्णू हॉल येथे गरजवंताना मोफत भोजनाची व्यवस्था सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात आली आहे.

Next
ठळक मुद्दे कणकवलीत नगराध्यक्षांचा गरजवंतांना आधार ! रोज २०० जणांना मोफत जेवण व अल्पोपहाराची सोय 

सुधीर राणे

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची मुदत वाढली असल्याने कुणीही गरजवंत अन्नाअभावी वंचित राहु नये अथवा त्याची उपासमार होऊ नये या उद्दात्त हेतुने कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे नगरसेवकांना सोबत घेऊन शहरात अभिनव संकल्पना राबवित आहेत. ते माणुसकीच्या भावनेतून दररोज गरजवंतांची मोफत भोजनाची व्यवस्था करीत आहेत. या उपक्रमाचे 'कमळ थाळी ' असे नामकरण करण्यात आले आहे. दररोज २०० हुन अधिक गरजवंत या भोजनाचा लाभ घेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर झाले आहे. या कालावधीत गरजवंतांची उपासमार होऊ नये याच उद्देशाने नगराध्यक्ष समीर नलावडे हा उपक्रम राबविला आहे. नलावडे यानी यापुर्वीच आपला एक महीन्याचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी सुपुर्द केला होता. तर आता नगराध्यक्ष पदाचा ११ महीन्याचा पगार या उपक्रमासाठी ते खर्ची घालणार आहेत. त्यांना इतर नगरसेवकांचीही समर्थ साथ लाभली आहे.

कणकवली शहरातील विद्यानगर येथील लक्ष्मी विष्णु हॉल जवळील वेदांत हॉटेल येथे दुपारी १२ ते २ या वेळेत 'कमळ थाळी' गरजवंतांसाठी उपलब्ध असते. शासनाने कणकवली शहरात शिवभोजन योजना सुरु केली आहे.

शिवभोजनासाठी गरजवंताना ५ रुपये थाळीसाठी द्यावे लागत आहेत . मात्र , या पुढचे एक पाऊल टाकताना नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कणकवली शहरामध्ये लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेक मजूर त्याचप्रमाणे फळ, भाजी विक्रेते तसेच काही कामानिमित्ताने दाखल झालेले लोक अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍यांचा रोजगार हिरावला गेला असून अशा लोकांना एकवेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले आहे.

ही बाब प्रकर्षाने समीर नलावडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच गरजवतांना मोफत भोजन देण्यासाठी ' कमळ थाळी ' ची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे . सुरवातीला १५० थाळी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच दिवशी १८० गरजवंतांनी भोजनासाठी हजेरी लावल्याने त्यांची व्यवस्था करण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवसापासून २०० थाळ्यांचे नियोजन करण्यात आले.

भोजनासाठी आलेला कोणीही गरजवंत उपाशीपोटी परत जाऊ नये यासाठी हॉटेल वेदांतचे मालक संदीप आचरेकर हे त्यांची पत्नी सिया आचरेकर यांच्यासह विशेष परिश्रम घेत आहेत.

सोशल डिस्टंन्सिगचे पालन !

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचे काम बंद झाले असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असलेल्या अनेकाना रोजगारच नसल्याने कणकवली येथे सोशल डिस्टंन्सिग पाळत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही या उपक्रमाला सहकार्य मिळत आहे. १५एप्रिल पासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकावेळी ५० गरजवंतांची भोजनाची व्यवस्था केली जाते. साधारणतः चार टप्प्यात दररोज २०० गरजवंत त्याचा लाभ घेतात.

आमदारांकडून सहकार्य !

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या या संकल्पनेला कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यानी दाद दिली असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच त्यांचे विविध मार्गातून या उपक्रमाला सहकार्यही लाभत आहे.

आदल्या दिवशीच केली जाते तयारी !

गरजवंतांना दुसऱ्या दिवशी भोजनात कोणते पदार्थ द्यायचे याचे नियोजन आदल्या दिवशी केले जाते. विविध जिन्नस आणून ठेवले जातात. तर वेळेत स्वयंपाक तयार व्हावा यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून खाद्य पदार्थ बनविले जातात.

ही सर्व जबाबदारी हॉटेल वेदांतचे मालक संदीप आचरेकर , त्यांची पत्नी सिया तसेच प्रथमेश सावंत, बापू गुरव, साई परब, कल्पना ठाकूर, मनीषा धुरी तसेच अन्य सहकारी लीलया पेलत आहेत. जेवण वाढण्यासाठी नगरसेवक तसेच इतर कार्यकर्ते मदत करीत असतात. रविवार , बुधवार अशा दिवशी मांसाहारी जेवणाची सोय केली जाते. इतर दिवशी शाकाहारी जेवण असते.

अल्पोपहाराच्या २०० पाकिटांचे वाटप !

कणकवली शहरात लमाण, कातकरी , डोंबारी असा समाज आहे. या समाजातील मुले तसेच गरवंताना दरदिवशी शिरा, पोहे, उपमा, खिचडी असा अल्पोपहार त्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन वाटला जातो. तसेच पोलीस , नगरपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना अल्पोपहाराच्या २०० पाकिटांचे वाटप केले जाते.

शिशिर परुळेकर यांच्यासह अन्य नगरसेवक व कार्यकर्ते हे अल्पोपहार वाटपाचे काम करीत असतात. नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांचे सहकारी या अल्पोपहारासाठी साहित्य पुरवीत असतात. तर विनामूल्य अल्पोपहार बनविण्याची सेवा संदीप आचरेकर हे सामाजिक भावनेतून करीत आहेत.


सामाजिक भावनेतून देतो सेवा !
हॉटेल वेदांतच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना वर्षाचे बाराही महिने विविध प्रकारची सेवा देत असतो. मात्र , आता कोरोनासारख्या भयंकर स्थितीत गरजवतांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. सामाजिक भावनेतून ही सेवा आम्ही देत आहोत.
संदीप आचरेकर,
हॉटेल व्यावसायिक .


कठीण काळात दिलेला आधार महत्वाचा !

दररोज रोजी रोटी साठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. सध्या कामधंदा बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे उपाशीपोटी रहाण्याची वेळ आली आहे. या कठीण काळात समीर नलावडे व सहकाऱ्यांनी आमच्या जेवणाची व्यवस्था करून दिलेला आधार महत्वाचा आहे. अशी प्रतिक्रिया अनेक गरजवंतांनी व्यक्त केली.


 

Web Title: CoronaVirus Lockdown:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.