CoronaVirus Lockdown : दररोज २८ लाखांचे नुकसान, एसटीवर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 03:50 PM2020-04-02T15:50:42+5:302020-04-02T15:55:44+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे दररोजचे तब्बल २८ लाखांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीचा तोटा आणखीनच वाढत आहे. या नुकसानीचा जबरदस्त फटका पुढील काळात कर्मचाऱ्यांनाही बसणार आहे.
कणकवली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी एसटीच्यासिंधुदुर्ग विभागाचे दररोजचे तब्बल २८ लाखांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीचा तोटा आणखीनच वाढत आहे. या नुकसानीचा जबरदस्त फटका पुढील काळात कर्मचाऱ्यांनाही बसणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या घटल्याने सिंधुदुर्ग एसटी विभागातील विविध आगारातील काही गाड्यांच्या फेऱ्या १८ मार्चपासून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सरासरी तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान दररोज सहन करावे लागले.
२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूमुळे एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळीही गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. तर आता १४ एप्रिलपर्यंत एसटी सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यातील विविध मार्गांवर रोज धावणाऱ्या २ हजार ५७९ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत.
यामुळे एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला दररोज २७ लाख ६७ हजार ८३८ रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील एसटीची सेवा रद्द झाल्याने राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात भरीसभर म्हणून शासनाने सुरू केलेल्या शिवशाहीच्या सेवेमुळे नुकसानीत वाढ होत आहे.
त्यामुळे या महिन्याचे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे ? हा महामंडळाच्या अधिकाऱ्यांपुढील यक्षप्रश्न आहे. कोरोना आजारामुळे गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने लालपरीची चाके थांबल्याने आगामी काळात मोठ्या नुकसानीला एसटी महामंडळाला सामोरे जावे लागणार आहे.
दुकानभाडे माफ करण्याची मागणी
एसटी बंदमुळे बसस्थानकांतील विविध दुकानेही पूर्णत: बंद झाली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून भाडे भरण्याची भ्रांत दुकान गाळे धारकांसमोर आहे. त्यामुळे शासनाने दुकान गाळ्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.