CoronaVirus Lockdown : भाजपची कोविड आपत्ती नियंत्रण समिती, नारायण राणे अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 04:33 PM2020-05-20T16:33:56+5:302020-05-20T16:38:11+5:30
कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनात समन्वय नसून भविष्यात धोकादायक परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे ...
कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनात समन्वय नसून भविष्यात धोकादायक परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली ३३ जणांची कोविड आपत्ती जिल्हा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.
आतातरी पालकमंत्र्यांनी कोणाचेही ऐकून पक्षीय राजकारण करू नये. या कोरोना आपत्तीविरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन कार्यरत रहावे, असा सल्ला राजन तेली यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिला.
कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले, भाजपाची जिल्ह्यातील सत्तास्थाने पाहता जिल्हा परिषद भाजपकडे असून यामध्ये ३१ सदस्य आहेत. तसेच पंचायत समिती ५, नगरपंचायती ६, मालवण व दोडामार्ग येथे उपनगराध्यक्ष, जिल्ह्यातील ७५ टक्के ग्रामपंचायती भाजपाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावपातळीवर आमचेच पदाधिकारी कार्यकर्ते जिल्ह्यातील कोरोना विरोधातील लढाईत खऱ्या अर्थाने गेले दोन महिने कार्यरत आहेत. मात्र, कोविड समिती स्थापन करताना पालकमंत्री यांनी याचा विचार केलेला दिसून येत नाही हे दुर्दैव आहे असेही त्यांनी सांगितले.
सध्याच्या या आपत्तीजन्य परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असतानाही पालकमंत्री सामंत यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील इतर आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी यांना एकदाही विश्वासात घेतले नाही. तसेच कोरोना संदर्भातील सभेचे निमंत्रण न देता या सर्वांना डावलण्याचा प्रकार करून या आपत्तीजन्य परिस्थितीतही ते पक्षीय राजकारण करीत आहेत. हे सर्व चुकीचे आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ३३ व्यक्तींची कोविड आपत्ती जिल्हा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली.
यामध्ये सल्लागार म्हणून माजी मंत्री सुरेश प्रभू, आमदार रवींद्र चव्हाण, समन्वयक तेली, सहसमन्वयक समिधा नाईक, कार्यकारिणी सदस्य माजी खासदार निलेश राणे, नीतेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर तसेच इतर आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत समितीची कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे, असेही यावेळी राजन तेली यांनी सांगितले.