CoronaVirus Lockdown : विशिष्ट आजाराने त्या खलाशांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:35 PM2020-04-25T16:35:43+5:302020-04-25T16:40:04+5:30
देवगड बंदरातील नौकांवरील खलाशी पाय सुजणे या विशिष्ट आजाराने ग्रासले आहेत. यातील दोन खलाशांचा मृत्यु झाला तर १८ जणांना लागण झाली.
देवगड : देवगडमध्ये पाय सुजून दोन खलाशांचा झालेला मृत्यू हा अन्नबाधेतून झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला असून याबाबत खलाशांच्या धान्याचे नमुने अन्न भेसळ व औषध प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी दिली
देवगड बंदरातील नौकांवरील खलाशी पाय सुजणे या विशिष्ट आजाराने ग्रासले आहेत. यातील दोन खलाशांचा मृत्यु झाला तर १८ जणांना लागण झाली.
या खलाशांची नौका मालकांनी आरोग्य तपासणी केली मात्र स्पष्ट निदान झाले नाही. कोरोनाच्या संकटाने ग्रासलेले असतानाच नौकांवरील खलाशांना एका विशिष्ट आजाराने ग्रासले व यामध्ये दोन खलाशांचा मृत्यु झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. नौकांवरील सर्व खलाशांचा सर्व्हे करून तपासणी केली अशी माहिती डॉ. कोंडके यांनी दिली.
सुरूवातीला काही खलाशांना उलटी व जुलाबाचा त्रास होत होता तर काही खलाशांच्या पायांना सुज आली. या विशिष्ट आजाराने ग्रासलेल्या खलाशांना त्यांचा नौकामालकांनी ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी आणले. त्यातील गंभीर स्वरूप असलेल्या खलाशांना ओरोस येथे हलविण्यात आले त्यापैकी दोघांचा मृत्यु झाला.
शुक्रवारी देवगड ग्रामीण रूग्णालयात १८ खलाशांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकजण पाय सुजण्याचा आजाराने त्रस्त असल्याने त्याला ओरोस येथे पाठविण्यात आले तर उर्वरीत खलाशांना तपासणी करून पाठविण्यात आले अशी माहिती डॉ.भगत यांनी दिली.
या विशिष्ट आजाराचे अद्याप स्पष्ट निदान झाले नाही. मात्र फुड पॉयजनिंगमुळे हा आजार झाला असावा असा प्राथमिक अंदाज जिल्हा आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला असून त्यानुसार आजार असलेल्या खलाशी ज्या नौकांवर होते त्या नौकांवरील धान्याचे नमूने निरीक्षक अन्न भेसळ प्रशासन यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांनी दिली.