CoronaVirus Lockdown :रेड झोन मधून येणाऱ्या लोकांना गावात सोडून नका ; प्रांताधिकाऱ्यांशी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:59 PM2020-05-12T17:59:22+5:302020-05-12T18:01:44+5:30
एकाच वेळी गावागावात येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्यास वाद निर्माण होतील. तसेच गावात उद्रेक होईल . त्यामुळे प्रशासनाने आताच सावध होऊन योग्य नियोजन करावे. अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे केली .
कणकवली : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. रेड झोन मधून येणाऱ्या लोकांना चुकीच्या पद्धतीने थेट होम क्वारंटाइन केले जात आहे.शाळामध्ये संस्थात्मक क्वारंटाइन करण्याची जी व्यवस्था केली आहे ती पुरेशी नाही. स्थानिक समितींना योग्य त्या सूचना दिलेल्या नाहीत.त्यामुळे एकाच वेळी गावागावात येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्यास वाद निर्माण होतील. तसेच गावात उद्रेक होईल . त्यामुळे प्रशासनाने आताच सावध होऊन योग्य नियोजन करावे. अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे केली .
भाजपा शिष्टमंडळाने सोमवारी येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा सचिव जयदेव कदम, कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे,राजन चिके, नासिर काझी,संतोष किंजवडेकर,देवगड नगराध्यक्षा प्रणाली माने,वैभववाडी नगराध्यक्ष अक्षता जैतापकर, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, सदस्य मनोज रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार आर. जे.पवार,गटविकास अधिकारी मनोज भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ हे प्रमुख अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये अनेक व्यक्तींवर आरोग्य विभागाकडून होम क्वारंटाइन स्टॅम्प मारले जात नाहीत. रेड झोन मधून आलेले लोक थेट घरी जातात.खारेपाटण चेक नाक्याच्यापलीकडून तिथवली मार्गे लोक येतात. फोंडाघाट चेक पोस्ट ठरलेल्या जागी स्थलांतरीत केले नसल्याने लोक पळवाटा शोधून येत आहेत . दीड महिन्यात फारच अनुभव वाईट आहे. प्रशासन ही स्थिती आटोक्यात आणण्यास अपयशी ठरत आहे.
शाळेत क्वारंटाइन केलेले लोक आताच ऐकत नाहीत. जेव्हा आणखीन लोक येतील तेव्हा नियंत्रण ठेवणे कठीण होईल.
जिल्हापरिषदेच्या शाळा या सर्व व्यवस्थेसाठी कमी पडतात. शाळेत एक शौचालय, एक नळ,एक फॅन त्यात शेकडो लोकांची कशी व्यवस्था करणार ?त्यापेक्षा संबधित परिसरात व्हॉटल आहेत, ती भाड्याने घ्या आणि व्यवस्था करा.
कोणत्याही नेत्यांचा फोन आला की बाहेर गावाहुन आलेल्याना चेक पोस्ट वरून सोडले जात असेल तर तसे करू नका. जेवणाचे डबे पोचविण्याची सोयही चुकीची तसेच धोकादायक आहे .शासन निधी त्यासाठी खर्च करा.अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी ग्रामसमितीवर सर्वच जबाबदारी दिली आहे .ज्या गावात महिला सरपंच आहेत त्यांच्या अडचणी प्रशासनाने समजून घ्याव्यात. आम्हाला जगायचे आहे म्हणून आम्ही बाहेरून आलेल्यांची गावात व्यवस्था करतो आहोत.
राजन चिके म्हणाले , प्रत्येक गावात हजारो लोक येतील अशी स्थिती आहे ज्यांची मुंबईत सोय नाही त्यांनाच येथे आणा. तेथे स्थायिक आहेत त्यांना आधी आणू नका. नगराध्यक्ष माने म्हणाल्या , मुंबईतुन आलेले थेट होम क्वारंटाइन केले जातात. रेड झोन मधून येणाऱ्यांना घरी पाठवणे चुकीचे आहे.जे लोक आमच्या परिसरात येणार त्याची माहिती नगरपंचायतला प्रथम द्या.
दिलीप तळेकर म्हणाले , शाळेत क्वारंटाइन केलेले लोक पळून गेले तर काय करावे ? त्यांची रात्रीची जबाबदारी कोण घेणार? संतोष किंजवडेकर म्हणाले , हास्कुलमध्ये लोकांना ठेवण्यास संबधित संस्था तयार नाहीत . तिथे व्यवस्था नसल्याने रोष स्थानिक समितीवर येतो.मग काय करायचे ? नासिर काझी म्हणाले, ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन मधील लोक वेगवेगळे करा. तसेच आम्हाला कळवा की ते कोणत्या झोनमधले आहेत.
गावातील बंद घरांना संस्थात्मक क्वारंटाइन करणार !
तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रशासन चेकनाक्यावर प्राथमिक तपासणी करूनच पुढे सोडेल. रेड झोन मधून येणाऱ्यांना रेड कागदावर प्रतिज्ञापत्र देण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात तीन स्तरावर काम केले जाईल.रेड झोन मधील व्यक्ती थेट संस्थात्मक क्वारंटाइन होईल.कोव्हीड टेस्ट सेन्टर, डेडिकेशन सेन्टर निर्माण केले आहेत. सर्व हायस्कुल,महाविद्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार व्यवस्था केली जाणार आहे. ज्या घरात कोणीही राहत नाहीत, त्याच घरात संस्थात्मक क्वारंटाइन करून नागरिकांना ठेवू शकतो . तशा सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांनी यावेळी सांगितले.