CoronaVirus Lockdown : गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 06:38 PM2020-05-25T18:38:09+5:302020-05-25T18:38:39+5:30
सीमा भागातून गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गात ५ परीक्षा केंद्रांवर शनिवारपासून सुरु झाली. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा, आरोंदा केंद्रावर तर दोडामार्ग तालुक्यात भेडशी, आयी व चोर्ला केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे.
बांदा : सीमा भागातून गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षासिंधुदुर्गात ५ परीक्षा केंद्रांवर शनिवारपासून सुरु झाली. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा, आरोंदा केंद्रावर तर दोडामार्ग तालुक्यात भेडशी, आयी व चोर्ला केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे.
या केंद्रांवर एकूण १९७ विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती पहाणी अधिकारी भिकाजी धुरी यांनी दिली. सॅनिटाईज प्रश्नपत्रिका, सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करून विद्यार्थी प्रथमच परीक्षा देत आहेत.
सातार्डा प्री-प्रायमरी इंग्लिश मीडियम प्रशाला केंद्रावर एकूण ७१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्रप्रमुख म्हणून आरोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुषमा मांजरेकर काम पाहत आहेत. आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, पोलीस, पर्यवेक्षक अशी २० जणांची टीम तेथे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सातार्डा स्कूल कमिटी अध्यक्ष उदय परिपत्ये, सरपंच भरत मयेकर, ग्रामपंचायत सदस्य सागर राऊळ, विलास राऊळ, कवठणी सरपंच सुमन कवठणकर, सुधा कवठणकर, आरोग्य सेवक शेडकर, सागर प्रभू, योगेश गोवेकर, काशिनाथ केरकर, पत्रकार प्रवीण मांजरेकर, परशुराम मांजरेकर, गणेश सातार्डेकर, सुशिल गोवेकर, सुधाकर वेंगुर्लेकर, आना आरोलकर, हर्षद पेडणेकर, श्रीकांत जाधव, सुनील नाईक, पोलीस पाटील विनीता मयेकर, होमगार्ड मिथिलेश नागवेकर यांची टीम कार्यरत आहे.
यावेळी डॉ. स्मिता शेलटे-नाईक यांनी विद्यार्थ्यांना अर्सेनिक गोळ्या व मास्कचे मोफत वाटप केले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
१९७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट
सातार्डा केंद्रावर ७१, आरोंदा १७, भेडशी ६१, आयी २४ तर चोर्ला केंद्रावर २४ असे एकूण सिंधुदुर्गचे १९७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परीक्षा घेतली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शारीरिक तपासणी करुनच प्रवेश देण्यात आला. शिवाय सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन करण्यात येत आहे. केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, पोलीस व स्वयंसेवक यांची टीम कार्यरत आहे.