CoronaVirus Lockdown : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:16 PM2020-05-13T15:16:32+5:302020-05-13T15:19:29+5:30
मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.
देवगड : मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.
आमदार राणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत सरपंचांना येणाऱ्या अडचणी व इतर गोष्टी यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी असे आश्वासन दिले आहे.
राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह इतर राज्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था शाळा, अंगणवाड्यांमध्ये करण्याचा सूचना गाव व्यवस्थापन कमिटीला दिल्या आहेत. परंतु गावातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये जागा कमी पडत असून प्रशासन आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे देवगड तालुक्यातील सरपंचांनी सांगितले.
देवगड तालुक्यातील सरपंचांनी प्रशासना विरोधात नाराजीचा सूर लावला. आमदार राणे यांनी पोलीस प्रशासन व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरपंचांशी व्डिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आमदार राणे यांनी गाव पातळीवरील समस्या जाणून घेतल्या. शाळेत नेमण्यात आलेले शिक्षक त्यांच्या मूळ गावी गेले असल्याची खळबळजनक माहिती बापर्डे सरपंच संजय लाड यांनी दिली. त्यामुळे चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यात येत असलेल्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. याबाबत प्रशासनाला विचारले असता अधिकारी एकमेकांवर ढकलत असल्याचे लाड यांनी सांगितले.
हडपीड सरपंच दाजी राणे यांनी सांगितले की, शासनाने शाळेच्या १५ बाय १५ च्या एका खोलीत ३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. परंतु ५० व्यक्ती गावात आल्यास काय करायचे ? याचे उत्तर नसल्याचे त्यांनी सांगितले.
या महिन्यात लहान मुलांसाठी डोस असून तो पुढील महिन्यात घेण्यात यावा. कारण कोरोनासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारीच डोस देण्यासाठी नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे डोस पुढील महिन्यात द्यावा, अशी मागणी वैभव साळसकर यांनी केली. विश्वनाथ खानविलकर यांनी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जागा अपुरी पडणार असून शासनाकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही, असे यावेळी सांगितले.
जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणार
यावेळी नीतेश राणे म्हणाले, गावपातळीवरील यंत्रणा कशी राबवायची हे सर्व निर्णय शासनाने व गावातील नागरिकांनी घ्यायचे आहेत. या यंत्रणेला आम्ही मदत करू व तुमच्या सर्व समस्यांमध्ये लक्ष घालून जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे सांगत त्यांनी सर्व सरपंचांना तशी ग्वाही दिली. तसेच उद्यापर्यंत सर्व सरपंचांना पीपीई किट देणार असल्याचेही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.