CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन धावली लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 04:41 PM2020-05-26T16:41:57+5:302020-05-26T16:44:45+5:30
लॉकडाऊनमुळे तिथवली येथे अडकून पडलेल्या झारखंड येथील २३ मजुरांना वैभववाडी येथून एसटी बसने ओरोस येथे नेण्यात आले. ओरोसहून विशेष रेल्वेने जिल्ह्यातील झारखंड येथील मजुरांना झारखंडमध्ये सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील या परप्रांतीय कामगारांना घेऊन दुपारी ही एसटी बस ओरोसकडे रवाना करण्यात आली आहे.
वैभववाडी : लॉकडाऊनमुळे तिथवली येथे अडकून पडलेल्या झारखंड येथील २३ मजुरांना वैभववाडी येथून एसटी बसने ओरोस येथे नेण्यात आले. ओरोसहून विशेष रेल्वेने जिल्ह्यातील झारखंड येथील मजुरांना झारखंडमध्ये सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील या परप्रांतीय कामगारांना घेऊन दुपारी ही एसटी बस ओरोसकडे रवाना करण्यात आली आहे.
गेले दोन अडीच महिने लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या या कामगारांच्या चेहऱ्यावर घरी जाण्याची ओढ दिसत होती.
तालुक्यातील रस्ते काम, बांधकाम, क्रशर, धरणांची कामे अशा ठिकाणी झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यातील मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे काम बंद असून आता पावसाळाही जवळ आल्यामुळे या सर्व कामगारांना घराची ओढ लागली आहे.
परप्रांतीयांना पास देण्याचे प्रशासनाचे नियोजन
अनेक परप्रांतीय मजूर ई-पास साठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. बिहार येथे जाणारे काही कामगारही पास मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. परप्रांतीय मजुरांची नोंदणी करून त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या गावी जाण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे.
बिहारमधील ३१२ कामगार रवाना
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातून बिहारमधील ३१२ कामगारांना ओरोस येथील रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले. या सर्व कामगारांना निरोप देण्यासाठी सावंतवाडी बस स्थानकावर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह तहसीलदार राजाराम म्हात्रे आले होते. वैद्यकीय पथकेही बसस्थानकावर तैनात करण्यात आली होती.
सावंतवाडी तालुक्यातून बिहारकडे जाण्यासाठी ३१२ कामगारांची नोंदणी झाली होती. या सर्व कामगारांना सोमवारी सकाळी येथील बस स्थानकावर बोलविण्यात आले. त्यानंतर सर्व एसटी बस् मधून ३१२ कामगार ओरोस रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. सायंकाळच्या सुमारास हे सर्व कामगार बिहारकडे रवाना झाले.
या सर्व कामगारांना निरोप देण्यासाठी सावंतवाडी बस स्थानकावर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह तहसीलदार राजाराम म्हात्रे आले होते. तसेच वैद्यकीय पथकेही बसस्थानकावर तैनात करण्यात आली होती. त्याशिवाय कामगारांना बसमध्ये खाद्यपदार्थही देण्यात आले होते. कामगारांनी याबाबत प्रशासनाचे आभार मानले.