CoronaVirus Lockdown : खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 12:37 PM2020-05-08T12:37:29+5:302020-05-08T12:39:11+5:30
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने गेला दीड महिना खारेपाटण बाजारपेठ जीवनावश्यक सुविधा वगळता पूर्णत: बंद आहे. परंतु मंगळवारी अचानक खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
खारेपाटण : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने गेला दीड महिना खारेपाटण बाजारपेठ जीवनावश्यक सुविधा वगळता पूर्णत: बंद आहे. परंतु मंगळवारी अचानक खारेपाटण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
खारेपाटण बाजारपेठेत दर शनिवार हा आठवडा बाजाराचा दिवस असूनही खारेपाटण ग्रामपंचायतीने आठवडा बाजार बंद करून या दिवशी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला येथील व्यापारी असोसिएशननेही पाठींबा दिला.
मंगळवारी अचानक बाजारपेठेत वाढलेली गर्दी ही खारेपाटण शहराला लागून असणारी व खारेपाटण बाजारपेठेवर पूर्णत: अवलंबून असणाऱ्या आजुबाजूच्या गावातील नागरिकांची सामान खरेदीसाठी झाली होती.
यावेळी बऱ्याच किराणा दुकानांसमोर गर्दी झालेली दिसून येत होती. तर विशेषत: बॅँक आॅफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण या बॅँकेच्या बाहेर सुमारे १०० हून अधिक ग्राहक होते. तेथे कुठल्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्स ठेवण्यात आले नव्हते. या पाठोपाठ स्टेट बॅँक आॅफ इंडिया व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतसुद्धा ग्राहकांची गर्दी दिसून येत होती.
गर्दीवर नियंत्रण ठेवावे
खारेपाटण बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ पहायला मिळाली. यामध्ये विना मास्क लावलेले नागरिकही फिरताना आढळले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून फिजिकल डिस्टन्स ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत होती.