CoronaVirus Lockdown : पोलिसांनी बाजारपेठेत फिरून दुकाने केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:25 AM2020-04-22T11:25:31+5:302020-04-22T11:26:45+5:30
देवगड-जामसंडे शहरात अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतरही दुकाने उघडण्यात आल्याने पोलिसांनी बाजारपेठेमध्ये फिरून अशी दुकाने बंद केली.
देवगड : देवगड-जामसंडे शहरात अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतरही दुकाने उघडण्यात आल्याने पोलिसांनी बाजारपेठेमध्ये फिरून अशी दुकाने बंद केली.
२० एप्रिलनंतर सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याची चर्चा होत होती. मात्र, उद्योग व्यवसाय काही प्रमाणात चालू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. २० एप्रिलनंतर कोणकोणते व्यवसाय चालू होणार याची पूर्ण कल्पना नसल्याने देवगडमधील काही दुकानदारांनी आपली अत्यावश्यक सुविधांमध्ये नसलेली दुकाने उघडली होती.
ही दुकाने उघडल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह देवगड जामसंडे बाजारपेठेमध्ये फिरून अत्यावश्यक सेवा वगळता जी इतर दुकाने उघडण्यात आली होती ती बंद करण्यास भाग पाडले. मात्र, व्यावसायिकांमध्येच संभ्रमावस्था निर्माण झाल्याने काही व्यावसायिकांनी दुकाने उघडली होती.
परंतु शासनाकडून अद्यापही प्रशासनाकडे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने सुरू करण्याबाबतचा निर्णय आला नसल्याचे संजय कातिवले यांनी सांगितले. त्यामुळे जी इतर दुकाने उघडण्यात आली होती. ती बंद करण्यास त्यांनी व्यावसायिकांना सांगितले.