CoronaVirus Lockdown : त्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करा, आचऱ्याच्या माजी सरपंचांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:50 AM2020-05-09T10:50:46+5:302020-05-09T10:53:05+5:30
संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे.
आचरा : आचरा परिसरातून कोरोना बाधित क्षेत्रात आंबा, भाजीपाला वाहतुकीच्यादृष्टीने गेलेले चालक व त्यांचे सहकारी यांना संस्थात्मक व होम क्वारंटाईन केले आहे. परंतु ते गावात परतल्यानंतर त्यांचा संपर्क त्यांच्या घरातील माणसांशी आला आहे, अशा कुटुंबातील माणसे राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत त्यांचा गावातील वाडीतील लोकांशी संपर्क येत आहे.
जर संस्थांत्मक क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याचा भुर्दंड सगळ्यांना भोगावा लागणार असल्याने संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे.
आचरा गाउडवाडी भागात कोरोना बाधित भागातून प्रवास करून किंवा वाहने घेऊन आलेल्या चालकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांच्या समवेत जगदीश पांगे, अनिल करंजे व ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर यांनी आचरा पोलिसांची भेट घेत संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबाही दक्षता म्हणून होम क्वारंटाईन करण्याची मागणी यावेळी केली.
आज पालकमंत्री सामंत व भाजपचे प्रमोद जठार हे मुंबईतील चाकरमानी यांना गावी आणणार असे सांगत आहेत. यामुळे गावात मुंबईस्थित चाकरमानी आले तर कोरोना फैलावणार तर नाही ना अशी भीती ग्रामीण भागातील प्रत्येकाला निर्माण झाली आहे.
मात्र, मुंबईकर यांना गावी आणण्याएवढी आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम आहे का? तेवढे व्हेंटिलेटर आहेत का?, आरोग्य विभागात तेवढा स्टाफ आहे का? असे अनेक प्रश्न प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात आहेत.
याची माहिती पालकमंत्री यांनी अगोदर द्यावी नंतरच मुंबईस्थित चाकरमानी यांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत जर यंत्रणा सक्षम नसेल तर येथे प्रेतांचे खच पडतील अशी भीती गावकर यांनी व्यक्त केली. याचा सारासार विचार करूनच मुंबईस्थित लोकांना गावी आणण्याचा निर्णय घ्यावा, असे राजन गावकर म्हणाले.