CoronaVirus Lockdown : रेड झोनमधल्या चाकरमान्यांचे नखरे, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 06:11 PM2020-05-15T18:11:13+5:302020-05-15T18:16:01+5:30
मालवण शहरांसह तालुक्यातील गावागावात चाकरमानी दाखल होत आहेत. रेड झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना शाळा तसेच अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या चाकरमान्यांच्या विविध नखऱ्यांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
मालवण : शहरांसह तालुक्यातील गावागावात चाकरमानी दाखल होत आहेत. रेड झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना शाळा तसेच अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या चाकरमान्यांच्या विविध नखऱ्यांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
दरम्यान, महागड्या जेवणासह हायफाय सुविधांची मागणी चाकरमान्यांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यातच चाकरमान्यांनी समाधान मानावे अशी समज प्रशासनाच्यावतीने संबंधितांना देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चांगली मेहनत घेतली आहे. तालुक्यातील गावागावातही प्रभावी जनजागृती करीत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग तसेच अन्य प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र मेहनत घेण्यात येत आहे.
यात आता मुंबईसह, पुण्यातील चाकरमानी गावी परतू लागले आहेत. आतापर्यंत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले आहेत. यात रेड झोनमधून आलेल्या चाकरमान्यांना संस्थात्मक विलगीकरणात गावागावातील शाळा तसेच अन्य ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
या चाकरमान्यांनी जेवणासह अन्य सुविधांसाठी होणारा खर्च हा स्वत: करायचा आहे.
प्रशासनाकडून केवळ पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या गावागावात याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या चाकरमान्यांकडून प्रशासनाकडे चायनीज द्या, वायफायची सुविधा द्या, राहण्यासाठी ज्या शाळा देण्यात आल्या आहेत त्यात झुरळे, उंदीर यांचा त्रास होत आहे. शाळेतच शौचालय, स्वच्छतागृहाची सुविधा द्या यासह अन्य मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत.
मुंबई, पुण्यासह अन्य भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावागावात दाखल होत आहेत. यात येथे येण्यासाठी संबंधितांनी जी कारणे दिली आहेत त्याची सत्यता पडताळण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. यात चुकीची कारणे देऊन केवळ मौजमजेसाठी आलेल्या चाकरमान्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.
काही चाकरमानी क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी न राहता इतरत्र फिरत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे अशा चाकरमान्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.