CoronaVirus Lockdown : करुळ पोलीस नाक्याचे स्थलांतर करा, पालकमंत्र्यांकडे केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 02:04 PM2020-05-21T14:04:15+5:302020-05-21T14:07:43+5:30
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ तपासणी नाका वस्तीच्या मध्यभागी असल्याने स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे सध्याचा पोलीस तपासणी नाका दिंडवणेपाटी येथे स्थलांतरित करावा, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील यांनी केली आहे.
वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ तपासणी नाका वस्तीच्या मध्यभागी असल्याने स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे सध्याचा पोलीस तपासणी नाका दिंडवणेपाटी येथे स्थलांतरित करावा, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील यांनी केली आहे.
याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन पाटील यांनी करुळ तपासणी नाका दिंडवणेपाटी येथे स्थलांतरित करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत होते.
निवेदनात असे म्हटले आहे, करुळ माध्यमिक विद्यालयानजीक पोलीस तपासणी नाका आहे. या मार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहनांची येथे तपासणी केली जाते. या नाक्यामुळे चोरी, तस्करीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. परंतु, लॉकडाऊन काळातील संचारबंदीमुळे करुळ गावातील भट्टीवाडी, दिंडवणे, खडकवाडी या तीन वस्त्यांमधील नागरिकांना आता हा तपासणी नाका अक्षरश: नकोसा झाला आहे.
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या तीनही वाडीतील लोकांना जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी गावातील बँक, किराणा आणि रास्त दुकानावर किंवा वैभववाडी बाजारपेठेत येणे मुश्किल झाले आहे. या तिन्ही वाड्या पोलीस तपासणी नाक्याच्या पलिकडे असल्यामुळे संचारबंदी लागू झाल्यापासून गावातील वाहनांना तालुक्यात येण्यास प्रवेश बंदी आहे.
ई-पास असेल तरच या तपासणी नाक्यावरुन तीन वाडीतील ग्रामस्थांना गावात किंवा तालुक्यात सोडले जाते. स्वत:च्या गावात जाण्यासाठी सुध्दा येथील लोकांना परवानगी नाही. त्यामुळे येथील लोक हैराण झाले आहेत.
या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन करुळ तपासणी नाका या तीन वस्त्यांच्या शेवटच्या टोकाला स्थलांतरित करुन स्थानिकांची या त्रासातून सुटका करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे, असे पाटील यांनी पालकमंत्री सामंत यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.