CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता, बससेवा सुरू, कर्फ्यू मात्र लागूच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:58 PM2020-05-22T17:58:07+5:302020-05-22T18:00:09+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी यांनी शिथिलता दिली आहे. मात्र, सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कलम १४४ अर्थात कर्फ्यू लागूच राहणार आहे.

CoronaVirus Lockdown: Some relaxation in lockdown, bus service resumes, curfew only ..! | CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता, बससेवा सुरू, कर्फ्यू मात्र लागूच..!

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता, बससेवा सुरू, कर्फ्यू मात्र लागूच..!

googlenewsNext
ठळक मुद्दे लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता : के. मंजुलक्ष्मी बससेवा सुरू, कर्फ्यू मात्र लागूच..!

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गुरुवारपासून लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी यांनी शिथिलता दिली आहे. मात्र, सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कलम १४४ अर्थात कर्फ्यू लागूच राहणार आहे.

बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, मॉल वगळता इतर सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील. सर्व शासकीय कार्यालये, जिल्हांतर्गत एसटी बससेवा व रिक्षाही सुरू राहतील. मास्क न वापरल्यास दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक माहिती अधिकारी जाधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, राज्य शासनाने बुधवारपासून जिल्ह्यात काय सुरू ठेवावे व काय सुरू ठेवू नये याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान सुरू राहतील.

दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, त्याठिकाणी गर्दी झाल्यास दुकान तत्काळ बंद करून गर्दी पांगविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बससेवा ही सुरू ठेवली जाणार आहे. सोशल डिस्टन्स ठेवून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. ५० टक्के प्रवासी त्या बसमध्ये असणार आहेत. रिक्षा वाहतूकही सुरू ठेवली जाणार आहे.

रिक्षात चालक आणि दोन प्रवासी अशी नियमावली असेल. घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. कापडी रुमालही चालेल. परंतु मास्क आवश्यक आहे. मास्क न वापरलेल्या व्यक्तीला २०० रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. हे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस यांना दिले आहेत. यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंडाची तरतूद पुढेही सुरू राहणार आहे.

आठवडा बाजार सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत नियमावली तयार करण्याचे काम केले जात आहे. राज्य शासनाने चौथ्या लॉकडाऊनमध्ये रेड झोन व नॉन रेड झोन असे दोनच झोन जारी केले आहेत. सिंधुदुर्ग हा नॉन रेड झोनमध्ये येतो. त्यानुसार ही नियमावली असेल.

कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या प्रत्येकास संस्थात्मक अलगीकरण व उर्वरितांना गृह अलगीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाले आहेत. त्यांना नियमावली समजण्यासाठी पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. होम क्वांरटाईनमध्ये असलेल्या नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे गुन्हा आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

सर्व शासकीय कार्यालये सुरू राहणार

शासनाच्या नव्या निर्देशानुसार बंद असलेली शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. यात उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), रजिस्टर कार्यालय यासह अन्य कार्यालयांचा समावेश आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

सरपंचांचे केले अभिनंदन!

ग्रामपंचायत स्तरावर बाहेरून आलेल्या नागरिकांची उत्तम व्यवस्था केली आहे. त्यामुळे सरपंच अभिनंदनास पात्र आहेत. तसेच रुग्णालय, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून एकही दिवस या कर्मचाऱ्यांनी सुटी घेतली नाही. या काळात प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातून मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान येथे मजूर जाण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी परवानगी मागितली आहे. त्या त्या राज्यांनी परवानगी दिल्यास रेल्वेने त्यांना गावी पाठविण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

Web Title: CoronaVirus Lockdown: Some relaxation in lockdown, bus service resumes, curfew only ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.