CoronaVirus Lockdown : घरातच थांबण्याच्या आदेशाला हरताळ, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक आंबोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 07:44 PM2020-04-25T19:44:33+5:302020-04-25T19:56:05+5:30
जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांना पुढील काही दिवस घरी थांबण्याचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत ते पुन्हा बैठकीनिमित्त शनिवारी आंबोली येथे आल्याने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
सावंतवाडी : जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांना पुढील काही दिवस घरी थांबण्याचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत ते पुन्हा बैठकीनिमित्त शनिवारी आंबोली येथे आल्याने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने माहिती मिळताच लागलीच चौकशी सुरू केली पण तोपर्यंत ते आंबोलीतून कोल्हापूरकडे निघून गेले होते. दरम्यान धुमाळ यांची चौकशी करण्याचा आदेश यापूर्वीच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी दिले आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी आहे. असे असतानाही कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हनमंत धुमाळ हे जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत शासकीय वाहनातून खाजगी चालक घेत सातारा येथे गेले होते. तेथे ते परवानगी विना राहिले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर येथील शहाजी देसाई यांनी केली होती.
या मागणीनंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक क्लॅमेंट बेंन यांना चौकशीचे आदेश दिले होते. ही सध्या चौकशी सुरू असून, धुमाळ यांना कोल्हापूर येथेच थांबण्याचे आदेश दिले होते. त्यांना बाहेर पडू नका असे स्पष्टपणे बजावले होते.
मात्र शनिवारी सकाळी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक क्लॅमेंंट बेंन हे हत्ती बांधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी दोडामार्ग येथे आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत धुमाळ असल्याचे अनेकांनी पाहिले असल्याने लागलीच या घटनेची चौकशी सुरू झाली. तसेच दोडामार्गमधील पाहणी संपवून बेन व धुमाळ हे दोघेही आंबोली येथील विश्रामगृहावर दाखल झाले होते.
तोपर्यंत आंबोली दूरक्षेत्राच्या पोलिसांनी विश्रामगृहावर जाऊन या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच विचारणाही केली. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनाही याबाबत माहिती मिळताच त्यांनीही प्रांताधिकारी सुशात खांडेकर यांना माहिती दिली.
या घटनेची चर्चा जोर धरू लागल्याचे कळताच मुख्य वनसंरक्षक क्लॅमेंंट बेंन यांच्यासह उपवनसंरक्षक धुमाळ यांनी आंबोलीतून काढता पाय घेत थेट कोल्हापूर गाठले आहे. बैठकीबाबत जिल्हाप्रशासनाने ही माहिती घेतल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांना विचारले असता त्यांनीही दुजोरा दिला असून, कोल्हापूर येथील काहींनी आम्हाला फोनवरून माहिती दिली आहे. त्याप्रमाणे आम्ही चौकशी केली असल्याचे सांगितले.