CoronaVirus Lockdown : नरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावी, कणकवली तहसीलदारांनी दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:47 PM2020-05-18T17:47:20+5:302020-05-18T17:48:35+5:30

पावसाळा तोंडावर आल्याने तसेच उपासमार होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्ह्यात चालत निघालेल्या कामगारांना करूळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून कणकवली तहसील कार्यालयात आणण्यात आले.

CoronaVirus Lockdown: Workers on Nardve Dam go to village on foot, support given by Kankavli Tehsildar | CoronaVirus Lockdown : नरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावी, कणकवली तहसीलदारांनी दिला आधार

कणकवली तहसील कार्यालयाजवळ परजिल्ह्यातील कामगार थांबले होते.

googlenewsNext
ठळक मुद्देनरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावीकणकवली तहसीलदारांनी दिला आधार

कणकवली : पावसाळा तोंडावर आल्याने तसेच उपासमार होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्ह्यात चालत निघालेल्या कामगारांना करूळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून कणकवली तहसील कार्यालयात आणण्यात आले.

नरडवे धरण प्रकल्पाचे काम लॉकडाऊनमुळे बंद पडले आहे. त्यातच या प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून कामगारांशी संपर्क बंद झाला. त्यामुळे नरडवे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तीन ते चारवेळा मोफत जीवनावश्यक साहित्य दिल्याने कशीतरी गुजराण तेथील कामगारांची सुरू होती. 

कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी या कामगारांच्या तात्पुरत्या निवार्‍याची व जेवणाची व्यवस्था केली. नरडवे धरण ठेकेदार व पाटबंधारे विभागाकडून बेदखल झालेल्या या कामगारांना कणकवली तहसीलदारानी आधार दिला आहे.

नरडवे धरण प्रकल्पाच्या कामासाठी नाशिक येथील ठेकेदाराने पुणे जिल्ह्यातील शिरूर, चाकण व लातूर येथील कामगारांना कामासाठी आणले होते. धरण प्रकल्पामध्ये झोपड्या बांधून हे कामगार काम करत होते. दोन्ही जिल्ह्यातील मिळून ३७ महिला, पुरूष व लहान मुले नरडवे धरण प्रकल्पस्थळी राहत होती.

लॉकडाऊननंतर काही दिवस काम झाले, त्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण बंद करण्यात आल्याने या कामगार कुटुंबांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. दोन महिने लॉकडाऊनमध्ये अडकल्यानंतर गावी कसे जायचे? हा प्रश्‍न या कुटुंबासमोर निर्माण झाला होता.

दोन दिवसांपूर्वी नरडवे परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला होता. त्यात कामगार कुटुंबांच्या झोपड्या कोसळल्या. पावसात भिजतच रात्र या कुटुंबांनी काढली. पावसाळा तोंडावर आल्याने येथे राहण्यापेक्षा गावी गेलेले बरे या विचारातून दोन दिवसांपूर्वी हे कामगार कुटुंबिय चालत निघाले होते. लातूरकडे जाणारे कामगार फोंडाघाटातून दाजीपूरला पोहोचले, तर पुणे जिल्ह्यात जाणारे कामगार पाचलच्या दिशेने निघाले होते.

त्यांना चेकपोस्टवर अडविल्यानंतर त्यांची माहिती कणकवली तहसील कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार आर. जे. पवार यांनी दोन मिनिबस पाठवून त्या कामगारांना कणकवली येथे आणले. त्यानंतर या सर्व कामगारांची कणकवली नगरपंचायतीच्या मुडेश्‍वर मैदानजवळील पर्यटन सुविधा केंद्रात व्यवस्था करण्यात आली. इमारतीची तातडीने साफसफाई करून तेथे कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 

सर्व कुटुंबांना पुढील काही दिवसांसाठी पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य तसेच मुलांना खाऊ वितरित करण्यात आल्याचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी सांगितले. दरम्यान, या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी आता व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

Web Title: CoronaVirus Lockdown: Workers on Nardve Dam go to village on foot, support given by Kankavli Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.