CoronaVirus: आम्हाला गावाकडे जाऊ द्या; गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गवासीयांची आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:06 AM2020-03-27T00:06:26+5:302020-03-27T00:11:54+5:30
लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे गोव्यात अडकले
- सचिन खुटवळकर
दोडामार्ग : लॉकडाऊन व कर्फ्यूमुळे संचारबंदीसोबतच गोव्याच्या सीमेबाहेर जाणे अशक्य बनले आहे. अशा स्थितीत पुढचे २० दिवस कसे काढायचे, हा यक्षप्रश्न गोव्यात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्यांना सतावत आहे. आता त्यांना वेध लागले आहेत ते गावी परतण्याचे. पण परतीचे मार्ग बंद असल्यामुळे सिंधुदुर्ग व गोव्याच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आम्हाला गावाकडे नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील वायंगणतड येथील मनीषा तुकाराम नाईक यांनी आपबिती 'लोकमत'कडे कथन केली. त्या म्हणाल्या, मी दोन मुलांसह पणजीजवळ चिंबल राहते. गावाकडे जायचे तर वाहतुकीची व्यवस्था नाही. घरातच राहायचे, तर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आहे. कर्फ्यूमुळे घराबाहेर पडता येत नाही. आम्हाला सिंधुदुर्गमध्ये जायचे आहे. गोवा सरकार व सिंधुदुर्गच्या लोकप्रतिनिधींनी विशेष हेल्पलाइनच्या माध्यमातून आम्हाला घरी पोहोचण्यासाठी सहकार्य करावे.
मळगाव-सावंतवाडी येथील सचिन राऊळ हा युवक फोंडा येथे अडकला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, असे शेकडो सिंधुदुर्गवासीयांची गोव्यात राहत्या घरात कोंडी झाली आहे. काही घरमालक रूम सोडून जाण्यासाठी दबाव आणत आहेत. घरातील जीवनावश्यक वस्तू संपत आहेत. संचारबंदीमुळे वेठीस धरल्यासारखी अवस्था झाली आहे. या स्थितीत किमान सिंधुदुर्गमध्ये जाऊ देण्याकरिता मुभा मिळायला हवी. हवे तर आमच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करा, पण एकदा घरी जाऊ द्या. लॉकडाऊन किती दिवस चालेल, ते सांगता येणार नाही. त्यामुळे जगायचे असेल, तर गाव गाठणे हाच योग्य पर्याय आहे. त्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न व्हायला हवे.
दरम्यान, संचारबंदी लागू होण्यापूर्वी काही नागरिकांनी दोडामार्ग व पत्रादेवीमार्गे सिंधुदुर्गमध्ये प्रवेश केला. कोरोनाचे संकट टळेपर्यंत पुन्हा गोव्याच्या हद्दीत प्रवेश न देण्याच्या अटीवर त्यांना जाऊ देण्यात आले. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या लोकप्रतिनिधींनी पोलीस यंत्रणेला विश्वासात घेऊन सिंधुदुर्गवासीयांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.