CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना सावंतवाडीत ठेवण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:31 PM2020-05-30T17:31:01+5:302020-05-30T17:32:08+5:30
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोघे युवक कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांना सावंतवाडी कुटीर रूग्णालयातच दाखल करण्यात येणार होते. मात्र स्थानिक नागरिकांसह नगराध्यक्ष संजू परब यांनी या रूग्णांना कुटीर रूग्णालयात ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे या युवकांना अखेर ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. हा प्रकार गुरूवारी दुपारी कुटीर रूग्णालय परिसरात घडला आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोघे युवक कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांना सावंतवाडी कुटीर रूग्णालयातच दाखल करण्यात येणार होते. मात्र स्थानिक नागरिकांसह नगराध्यक्ष संजू परब यांनी या रूग्णांना कुटीर रूग्णालयात ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे या युवकांना अखेर ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. हा प्रकार गुरूवारी दुपारी कुटीर रूग्णालय परिसरात घडला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोन युवक कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. ते मुुंबई येथून कारिवडेत आले होते. त्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र कोरोना रूग्ण सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात हलवत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना समजली.
त्यानंतर उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी याला प्रथम विरोध केला. तसेच माजी नगरसेवक आरेकर तसेच रिक्षाचालक यांनी मिळून वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांना कोरोना रूग्ण येथे ठेवू नका, असे सांगितले.
दरम्यान रूग्णालय प्रशासन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांना बोलावून घेतले. नगराध्यक्ष परब यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर यांनी रूग्णालय अधीक्षक पाटील यांना याबाबत जाब विचारला.
ओरोस येथे जर कोरोना रूग्ण ठेवण्याची व्यवस्था असेल तर हे रूग्ण सावंतवाडीत का ठेवता असा सवाल केला. यावर डॉ.पाटील यांना नागरिकांचा असलेला विरोध बघून जिल्हा शल्य चिकित्सक धनजंय चाकूरकर यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना घटनेची माहीती दिली. त्यानंतर सदर रूग्ण ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.
नगराध्यक्ष परब यांनी समन्वयाची भूमिका घेत यावर तोडगा काढला. यावेळी राजू धारपवार, संतोष मुळीक, रफिक शेख, प्रसाद कोरगावकर, सुनिल होडवडेकर, सुहास सावंत आदी उपस्थित होते.