CoronaVirus : सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 02:36 PM2020-06-12T14:36:55+5:302020-06-12T14:38:46+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याबाबतचा निर्णय सावडाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.
कणकवली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याबाबतचा निर्णय सावडाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.
ग्रामपंचायतीचा आदेश झुगारून हौशी पर्यटक धबधब्याकडे जाऊ नयेत यासाठी धबधब्यापर्यंत जाणारा मार्ग देखील बंद केला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली नंतर सावडाव धबधबा या पर्यटन स्थळावर पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते . वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यात येणारे अनेक पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने पुढील काही दिवसांत सावडाव धबधबा प्रवाहित होणार आहे.
मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यंदा सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे . त्यामुळे पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालून सावडाव धबधब्याकडे येऊ नये असे आवाहन सावडाव सरपंच अजय कदम यांच्यासह उपसरपंच दत्ता काटे, ग्रामसेवक शशिकांत तांबे व ग्रामस्थांनी केले आहे.