Coronavirus: कोरोनामुळे वर्षभर उभ्या राहूनही सावंतवाडी आगाराच्या बसेस तंदुरुस्त, असं केलं नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 03:38 PM2021-06-03T15:38:17+5:302021-06-03T15:38:54+5:30
ST Bus News: कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे.
- रजत सावंत
सावंतवाडी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली असून, आजपासून काही ठिकाणी निर्बंध शिथिलही केले आहेत. कोरोनाने एकीकडे नागरिकांचे आराेग्य खालावत असताना वर्षभर आगारात उभ्या असलेल्या येथील एसटी आगाराच्या बसेसचे आराेग्य मात्र तंदुरुस्त असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे. सावंतवाडी आगाराच्या ७५ बसेस वाहतूक बंद राहिल्याने वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थही शहरात खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे प्रवासीच नसल्याने बस वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. टाळेबंदीमध्ये सावंतवाडी एसटी प्रशासनाने चार फेऱ्या चालू ठेवल्या आहेत. दरम्यान, टाळेबंदीच्या सुरुवातीला गेल्या वर्षी एसटी फेऱ्या बंद असल्याने त्यांचे काही भाग दुरुस्तीला येऊन सावंतवाडी आगाराला दिवसाला पाच लाखांचे नुकसान सहन करावे लागले होते. यावर उपाय म्हणून सध्या एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या बस गाड्यांना तीन दिवसांनंतर आगारातील मोकळ्या जागेत फिरवून चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे एसटीच्या भागांची गंजल्यामुळे किंवा इतर कारणाने झीज होत नसल्याचे आगाराकडून सांगण्यात अाले. त्यामुळे सधा नादुरुस्त बसची संख्या शून्यवर आहे.
सावंतवाडी आगराच्या एकूण बसेस -७५
टाळेबंदी काळात चालू बसेस - ४
उभ्या बसेस - ७१
नादुरुस्त बसेस - ०
वर्षातून फक्त सहा महिने रस्त्यावर
टाळेबंदीमुळे गेल्या वर्षभरात एसटी सहा महिने चालू होती. सहा महिन्यांमध्ये सावंतवाडी आगराच्या ७५ बसेस ह्या प्रवाशांच्या सेवेसाठी आगाराबाहेर पडल्या होत्या. सद्यस्थितीत या आगराच्या चार एसटी फेऱ्या चालू आहेत.
आता खर्च किती येणार
याबाबत सावंतवाडी एसटी प्रशासनाला विचारले असता सध्या बसेस आगाराबाहेर जात नाहीत. त्यामुळे तीन दिवसांनी बसेस चालू करून आगाराच्या आवारात फिरवल्या जात आहेत. काही बस चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बसेस सुरू करायच्या म्हटल्यास खर्च येणार नाही़. मात्र, काही बसना खर्च करावा लागत आहे.
आधीच दुष्काळ
गेल्या वर्षभरात सावंतवाडी आगराची सहा महिने बस वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटीला १० कोटींचे नुकसान झाले आहे. बस फेऱ्या बंद असल्याने दिवसाला सुमारे पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
बस गाड्या चांगल्या स्थितीत राहाव्यात आणि देखभाल दुरुस्ती खर्च कमी यावा म्हणून दर तीन दिवसांनी बस गाड्या चालू करून आगराच्या आवारात फिरवल्या जातात. त्यामुळे इंजिन तसेच टायर खराब होत नाहीत. असे केल्याने बसेस चालू करायच्या झाल्यास खर्च कमी होईल.
- आगार व्यवस्थापक, सावंतवाडी