CoronaVirus : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे आणखीन सहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:49 AM2020-05-29T10:49:05+5:302020-05-29T10:49:43+5:30
सिंधुदुर्ग- जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना संसर्गाचे आणखीन सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बधितांची संख्या ३० एवढी झाली आहे. गेल्या सात दिवसात २२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
सिंधुदुर्ग- जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना संसर्गाचे आणखीन सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बधितांची संख्या ३० एवढी झाली आहे. गेल्या सात दिवसात २२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात २३ रुग्ण उपचार घेत असून ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात मे महिन्यात तब्बल ४६ हजारापेक्षा जास्त चाकरमानी दाखल झाले आहेत. तर हजारो मजूर आपापल्या गावी(परराज्यात) रवाना झाले आहेत.
सिंधुदुर्गात सहा कोरोना बाधित रूग्ण सापडले .त्यामध्ये वेंगूर्ला १,कुडाळ २, कनकवली १,सावंतवाडी १,देवगड १, या प्रमाणे तालुक्यात रूग्ण सापडले.
जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३० एवढी झाली सध्या २३ रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात काल कणकवली तालुक्यातील १, वैभववाडी तालुक्यात २, कुडाळ तालुक्यात २, सावंतवाडी तालुक्यात २ या प्रमाणे नवीन रुग्ण आढळले आहेत. कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील २२ वर्षीय पुरुष, कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे सापडलेली २२ वर्षीय युवती आणि ५० वर्षीय महिला असे तिन्ही रुग्ण हे कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे यापूर्वी आढळलेल्या कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील आहे. यातील शिवडावच्या रुग्णाचा स्वॅब दिनांक २५ मे रोजी तर पणदूर येथील दोन्ही रुग्णांचा स्वॅब २६ मे रोजी घेण्यात आला होता.
वैभववाडी तालुक्यातील तिरवडे गावातील ५८ वर्षीय पुरुष विरार येथून आला आहे. २५ मे रोजी सदर व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला होता. याच तालुक्यातील उंबर्डे गावातील रुग्ण हा पनवेल येथून आला आहे. त्याचा स्वॅब दिनांक २६ मे रोजी घेण्यात आला होता.
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावातील दोन रुग्ण हे पालघर, विरार येथून आले आहेत. त्यांचाही स्वॅब २६ मे रोजी घेण्यात आला होता. या सर्वांना जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून अलगीकरणात ठेवण्यात आले होते. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील ब्राह्मणदेववाडी, घोगरेवाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, कुडाळ तालुक्यातील पणदुर – मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यात एकूण २५ हजार ७२९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी ४०७ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर २४ हजार २६६ व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
नागरी क्षेत्रामध्ये १ हजार ५६ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ६०२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार ३०५ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील २४ अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत १ हजार २८१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
अजून २९७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ११० रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ७९ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ३१ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ५ हजार ५७६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण २४ कोरोना बाधीत रुग्णांपैकी ७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या १७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. २ मे २०२० पासून आज अखेर एकूण ४८ हजार २०० व्यक्ती दाखल झाल्या आहेत.